अमरावती (वृत्तसंस्था) महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर खासदार नवनीत राणा यांनी गंभीर आरोप केला आहे. यशोमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागात ८०० कोटींचा घोटाळा केला, असा खळबळजनक आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी याप्रकरणी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रार केली आहे.
राणा यांनी इराणी यांची भेट घेऊन तक्रार केली की, महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुंना सरकारतर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार आणि अन्य आवश्यक वस्तू न मिळाल्यामुळे गेल्या तीन महिन्यात मेळघाटात ४९ नवजात शिशुंचा मृत्यू झाला आहे. उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केलेल्या तसंच महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी आणि व्यंकटेश या कंपन्यांना पळवाट शोधून उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करण्यात आली आहे आणि कंझुमर फेडरेशनच्या माध्यमातून पुरवठा करण्याचे काम देण्यात आलं आहे. इतकंच काय तर यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांच्याच जिल्ह्यात इतक्या बालकांचा कुपोषणानं मृत्यू होणं ही अत्यंत खेदजनक तसंच लाजिरवाणी बाब असल्याचंही राणा यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
यशोमती ठाकूर विरुद्ध नवनीत राणा
नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपाला यशोमती ठाकुरांनी फेटाळून लावलं आहे. महाराष्ट्राचा आणि अंगनवाडीताईचा नवनीत राणा यांनी अपमान केला आहे, असं यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या. त्यामुळे आता अमरावतीत यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील बालमृत्यूप्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला असून काही कंत्राटदारांच्या प्रेमापोटी आज राज्यातील तमाम अंगणवाडी ताईंचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचं नाव खराब करायचं काम राणा यांनी केलं आहे, असे प्रत्युत्तर पालकमंत्री तथा महिला व बालसिकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहे. तसेच या संपूर्ण प्रकारामुळे आपण प्रचंड व्यथित असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
कुपोषणाच्या विरोधात मी मंत्री झाल्यापासून…
यशोमती ठाकूर यांनी नवनीत रणांचे आरोप फेटाळत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कुपोषणाच्या विरोधात मी मंत्री झाल्यापासून व्यापक चळवळ हाती घेण्यात आली. सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र अशी घोषणा देऊन राज्य सरकारने जे काम केलं त्याला गेल्या वर्षी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी स्वतः पहिल्या क्रमांकाचं बक्षिस देऊन गौरवलं आहे. तरी सुद्धा एकही बालक कुपोषित राहता कामा नये म्हणून आपण पोषण अभियानाची जनजागृती चळवळ वर्षभर राबवत आहोत. कोविड काळातही कड्याकपाऱ्यातून अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका दुर्गम भागात जाऊन पोषण आहार पोचवत आहेत. मेळघाटात मी स्वतः अनेक दौरे केले आहेत. तिथे मुक्काम करून सर्व यंत्रणा कशी जोमाने काम करेल यासाठी प्रयत्न केले आहे’, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.