जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परिषद मालकीच्या पाझर तलावातून अवैध गौण खनिज प्रकरणी १४ कंत्राटदार व लघुसिंचन विभागाशी संबंधित उपविभागातील अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश असताना अद्याप एकावरही गुन्हा दाखल झालेला नाही. सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी हे आदेश दिले होते. मात्र, त्यांच्या आदेशाला जि. प. अधिकाऱ्यांकडूनच ठेंगा दाखविला जात आहे.
जिल्ह्यातील जळगाव, एरंडोल, भडगाव, पाचोरा या चार तालुक्यातील लघुसिंचन विभागाशी संबंधित विविध साठवण बंधारे, सिमेंट नाला बंधारे, कोल्हापूर पद्धतीने दुरुस्ती अशी विविध ३६ कामांमधील रॉयल्टीची रक्कम न भरता त्याच्या बनावट पावती दाखवून लाखो रुपयांची हेराफेरी करण्यात आली आहे. यात ६३ लाख ५० हजार ४११ रूपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी १५ नोव्हेंबरला सदर प्रकरणातील कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून रक्कम व्याजासह वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, राजकीय दबावापोटी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समजते.
पैसे भरा त्याचे नंतर पाहू, अशी भूमिका सीईओंनी घेतल्याची चर्चा
गौण खनिज प्रकरणातील दोषी ठेकेदारांसह अभियंत्यांनी सीईओ डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन व्याजासह अपहाराची रक्कम भरण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, गुन्हे दाखल करू नका अशी विनंती करीत आहे. परंतु, अगोदर पैसे भरा, गुन्हे दाखलचे नंतर पाहू अशी भूमिका सीईओंनी घेतल्याची चर्चा आहे. तसेच काहींनी जि. प. पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनाही कारवाई होऊ नये म्हणून हात जोडत असल्याची चर्चा होत आहे.