विरार (वृत्तसंस्था) एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीनं जबरदस्तीने दोन वेळेस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विरार येथील तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचल्यानंतर तो भयावह अवस्थेत आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सोमवारी सामान आणण्यासाठी दुकानात गेली होती. दरम्यान पीडितेच्या इमारतीत राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीनं पीडितेला स्वत:च्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तातडीनं तुळिंज पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच, तुळिंज पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले पण पोलिसांना आरोपीचा मृतदेह आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर कारवाईच्या भीतीनं आरोपीनं आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे. पण आरोपीच्या आत्महत्येचं अधिकृत कारण अद्याप समोर आलं नसून पोलीस याचा तपास करत आहेत.