जळगाव (प्रतिनिधी) : आपल्या जळगाव शहराचा ‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ आज दि. २२ ऑगस्टपासून छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सुरू झाला. महोत्सवाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ‘वेदा’ मधील अभिनेत्री तन्वी मल्हारा यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आ. राजूमामा भोळे उपस्थित होते.
मंचावर सिनेअभिनेत्री तनवी मल्हारा, माजी महापौर सीमाताई भोळे, भारतीताई सोनवणे, ॲड.शुचिता हाडा, दीपमाला काळे, रंजना वानखेडे, सुरेखा तायडे, रेखा वर्मा, कुमुदिनी नारखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून भगवान नटराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर समन्वयक सचिन महाजन यांनी प्रस्तावना केली.स्पर्धकांनी आपले कौशल्य पणाला लावून सादरीकरण करावे. आपल्या आवडत्या कलाप्रकारातून करिअर करायचे असेल तर निश्चितच ध्येयप्रती सचोटीने वाटचाल करावी. निश्चितच आपल्याला यश मिळते असे सांगून तन्वी मल्हारा हिने महोत्सवातील स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर आ. राजूमामा भोळे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आपल्या संस्कृतीची, लोकपरंपरांची आणि लोककलांची ओळख विद्यार्थी – विद्यार्थिनींना व्हावी, त्यांच्या जडणघडणीला विविध कलांचा आयाम लाभून उद्याचा जागरुक व सुसंस्कृत नागरिक घडावा, या उद्देशाने दि. २२ ते २५ ऑगस्टदरम्यान आमदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आ. भोळे म्हणाले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर महिलादेखील मंचावर उपस्थित होत्या. यात डॉ.प्रीती दोषी, संध्या सोनवणे, अर्चना जाधव, शुभश्री दप्तरी, वैशाली सपकाळे, डॉ.एकता चौधरी, मेघा गोरडे, संगीता पाटील, मीनल जैन, भाग्यश्री सराफ, नीलाताई चौधरी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले.
महोत्सवात सुगम गायन, एकल नृत्य प्रकारात रंगत
शेकडो स्पर्धकांनी महोत्सवात सहभाग घेतला असून एकूण ११ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. गुरुवारी सकाळी रांगोळी व मेहंदी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळीत १५० तर मेहंदी ५० जणांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर शालेय व खुला गटात समूह गायन स्पर्धा झाल्या. शालेय १३ तर खुल्या गटात ६ जणांनी सादरीकरण केले. दुपारी १ वाजता एकल नृत्य स्पर्धेत १०० स्पर्धकांनी त्यांचे सादरीकरण केले.