जामनेर (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेतील भाजपचे २७ नगरसेवक शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याने भाजप नेते, आमदार गिरीश महाजन अडचणीत सापडले आहेत. त्यात आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
आमदार गिरीश महाजन यांना काही दिवसांपासून कोरोनासारखी लक्षणे जाणवत होती. या अनुषंगाने चाचणी करून घेतली असता त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जामनेरमध्ये क्वॉरंटाईन होऊन त्यांनी उपचार सुरू केले आहेत.
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी गुरुवारी (दि.१८) निवडणूक होत आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सत्ताधारी भाजपच्या २७ नगरसेवकांनी विरोधीपक्ष असलेल्या शिवसेनेला साथ देत बंड पुकारले आहेत. त्यामुळे भाजप नेते व संकटमोचक गिरीश महाजन महापालिका राजकारणातले डॅमेज कंट्रोल करण्यात व्यस्त असतानाच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भाजपासमोरील संकट गडद झालं आहे. रविवारी रात्री गिरीश महाजन यांनी जळगाव विमानतळावर नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान देखील महाजन तापाने फणफणले होते.