जळगाव (प्रतिनिधी) राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून मंत्रिमंडळात स्थान कोणाकोणाला? याबाबत राजकीय वर्तुळात खलबते सुरू आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातून पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील यांचे मंत्रिमंडळात स्थान पक्के असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
संभाव्य मंत्रिमंडळाबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. उत्तर महाराष्ट्रात शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांचे नाव सुरुवातीपासून पुढे आहे. परंतू आता अचानक पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे किशोर पाटील यांचेही नाव आघाडीवर आहे. आमदार किशोर पाटील यांचे संभाव्य मंत्रिमंडळात नाव आघाडीवर असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. किशोर पाटलांच्या रूपाने नवीन चेहरा लाभल्यास शिंदे गटाला विस्ताराची मोठी संधी जिल्ह्यात आहे. दुसरीकडे राज्यातील १०-१२ टक्के असलेला राजपूत समाज यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे वळू शकतो. राजपूत समाजाकडूनही किशोर पाटलांना मंत्रीपद मिळण्याची मागणी जोर धरत आहे. आ. किशोर पाटील यांच्या मंत्रीपदासाठी पाचोऱ्यात महाआरती करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर गेल्या दोन वर्षांत एकनाथ शिंदे हे तब्बल पाच वेळा आ. किशोर पाटील यांच्या निवासस्थानी येवुन गेल्याने आ. किशोर पाटील यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
















