जळगाव (प्रतिनिधी) चोपडा विधानसभा मतदार संघाच्या आमदार लताताई सोनवणे यांच्या कारला भरधाव येणाऱ्या डंपरने जबर धडक दिल्याची घटना शनिवारी करंज गावाजवळ शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी रात्री उशिरा अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी संध्याकाळी सात वाजता कुरवेल ते तावसा या रस्त्याचे आमदार लताताई सोनवणे यांच्याहस्ते भूमिपूजन होते. तो कार्यक्रम आटोपून आमदार सोनवणे यांच्यासह त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे हे रात्री आपल्या कारने चोपड्याकडून जळगावकडे येत होत्या. रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील करंज गावाजवळ जळगावकडून चोपड्याकडे जाणाऱ्या भरधाव डंपर (क्र.एम.एच.१९ झेड ६२४५)ने आमदार लताताई सोनवणे यांच्या इनोव्हा गाडी (एमएच – १९, बीयू- ९९९ ) ला जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, या धडकेत आमदार सोनवणे यांच्या चारचाकीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता.
या अपघातात आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, अंगरक्षक पो.ना अमित पिजांरी आणि चालक दीपक पवार हे जखमी झालेत. सर्व जखमींना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून फरार झाला होता. दरम्यान, चालक दीपक पवार यांच्या फिर्यादीवरून डंपर चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उप.निरीक्षक गणेश सायकर हे करीत आहेत.