चाळीसगाव : समस्या या सोडविण्यासाठीच असतात…त्यांचा अभ्यास आणि नेतृत्व दुरदूष्टीचे असेल तर विकासाचा महामार्ग साकारला जातोच. समस्येलाही मुक्ति मिळते. चाळीसगावात सुरु होत असलेल्या उपप्रादेशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ कार्यालयाची गोष्ट अशीच आहे, डोंगराएवढी… आणि आपले विकासाभिमुख, दमदार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी याचं डोंगराच्या शिरावर रोवलेल्या चाळीसगावच्या नव्या ओळखीच्या ‘एमएच ५२’ या झेंड्याचीही !
चाळीसगावला पौराणिक काळापासून भक्ति परंपरेचा मोठा वारसा आहे. कला, संस्कृती, अध्यात्म, राष्ट्रीय महामार्ग, निसर्गाचे विलोभनीय अविष्कार, रेल्वेचे जंक्शन स्टेशन, पर्यटन, दूध व्यवसाय, कुस्तीचे वैभव आणि बॕण्ड पथकांची अवीट सुरावट…चाळीसगावच्या अशा अभिजात लौकीकाचे निशाण अटकेपार रोवले गेले आहे. अलिकडच्या काही वर्षात एकुणच चाळीसगाव तालुक्याने वेगवेगळ्या क्षेत्रात कात टाकायला सुरुवात केलीयं. गेल्या साडेचार वर्षात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कर्तव्यकठोर नेतृत्वाने याला गतीची चाके दिली आहेत. सुरुवातीला राज्यात असलेली विरोधी पक्षाची सत्ता तसेच कोरोनाच्या महामारीनेही आमदार मंगेशदादा चव्हाण यांची मोठी परिक्षा घेतली. अशा प्रत्येक कठीण प्रसंगात मंगेशदादांचे नेतृत्व सुवर्ण झळाळीने उजळून निघाले. पुढे राज्यात सत्ता बदल होऊन महायुती सरकार सत्तारुढ झाल्याने चाळीसगावच्या विकासाच्या वाटेतील अनेक अडसर दूर झाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या खंबीर साथीने चाळीसगाव तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढत मंगेशदादा हा भला माणूस ‘भल्या’ कामाचा झेंडाचं खांद्यावर घेऊन निघाला आहे.
वरखेडे – लोंढे धरण कार्यान्वीत होण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. धरणाच्या बंदिस्त पाटचारीसाठी ६०० कोटी रुपये निधी मंजूर करुन आणत प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील झाली आहे. सद्यस्थितीत विखुरलेले सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभी राहिली आहे. रोहिणी व परिसरातील १७ पाणीटंचाईग्रस्त गावांना थेट गिरणा धरणावरून पाणी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे आहे… यासोबतच विस्तारित न्यायालय इमारत, उसतोड कामगारांच्या मुला – मुलींसाठी २०० विद्यार्थी क्षमतेचे दोन वस्तीगृह, महापुरास कारणीभूत असणारा चाळीसगाव शहरातील तितूर नदीवरील पूल, पंचायत समिती इमारत, राज्य उत्पादन शुल्क इमारत, पशुवैद्यकीय दवाखाना, नवीन प्रांत कार्यालय, तहसीलदार निवासस्थाने, नाट्य व कलाप्रेमींचे स्वप्न असणारें अत्याधुनिक नाट्यगृह, व्हीआयपी विश्रामगृह, शासकीय आदिवासी आश्रमशाळा इमारत व मुलींसाठी वस्तीगृह, ग्रामीण भागात रस्ते व पूल, गावांतर्गत कॉक्रीटीकरण, अशी शेकडो कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत… आता चाळीसगावचं प्रत्येक पाऊल विकासाच्या वाटेवर पडत आहे…नवा इतिहास घडत आहे. आपल्या चाळीसगावला कार्यरत झालेल्या आरटीओ कार्यालयाने याला लखलखणारे तोरण बांधले गेले आहे.
अर्थात आरटीओ कार्यालय मंजूर करण्याची वाट सोपी नव्हती. संघर्ष तर होताचं शिवाय अडचणींचे स्पीडब्रेकर, सरकारी लालफितीच्या गाठी घट्ट झालेल्या होत्या. गेल्या दोन दशकांपासून ही समस्या अजगरी विळख्यासारखी सुस्तावलेली होती. चाळीसगाव शहर आणि तालुकाही झपाट्याने विस्तारत असतांना नवनविन दळणवळणाच्या सुविधांनी कनेक्टीव्हीटी वाढली आहे. केंद्रीय पातळीवर कार्यरत विश्वगुरु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारच्या ऐतिहासिक १० वर्षाच्या जनकल्याणकारी व उद्योगस्नेही धोरणांमुळे गोरगरिब, कष्टक-यांना जगण्याची वाट गवसली तर मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना नवी पालवी फुटली आहे. दूचाकी, चारचाकी वाहनांसोबतच मोठी अवजड वाहने, ट्रक अशा वाहन खरेदीत व दळणवळणात लक्षणीय वृद्धी होत आहे. आपल्या दारापुढे एखादी दूचाकी – चारचाकी असावी, हे सर्वसामान्यांचे संकल्पही सत्यवत होत आहे.
वाहन खरेदीनंतर त्यांच्या नोंदणी व पासिंगसाठी चाळीसगाववासियांना १०० किमी अंतरावरील जळगाव गाठण्याशिवाय दूसरा पर्याय नव्हता. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे या तीन जिल्ह्याच्या सीमेलगत असणा-या गावातील नागरिकांना तर सव्वाशे ते दिडशे किलोमीटरचे अंतर पार करावे लागत होते. यात वेळेचा अपव्यय व्हायचा. वाहनधारकांना आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत होता. विशेषतः हातावर पोट असणाऱ्या अवजड वाहन धारक व रिक्षाचालक यांना याचा मोठा त्रास होत होता. त्यामुळे चाळीसगाव येथे आरटीओ कार्यालय व्हावे अशी मागणी खूप दिवसांपासून होती, त्यासाठी आंदोलन, उपोषणे देखील झालीत मात्र शासकीय अनास्था म्हणा किंवा पाठपुराव्याचा अभाव म्हणा… कार्यालय निर्मितीचा शिवधनुष्य कुणाकडूनच पेलला जात नव्हता. त्यातच भडगाव कार्यालयाचा प्रस्ताव पुढे आल्याने चाळीसगावकरांचे आरटीओ कार्यालयाचे स्वप्न केवळ स्वप्नच राहत की, काय अशी शंका यायला लागली.
मात्र परिस्थिती कितीही प्रतिकूल असो आपली हिम्मत खचू द्यायची नाही हा गुरुमंत्र त्यांना राज्याचे संकटमोचक म्हणून ओळख असणाऱ्या नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी दिलेला असल्याने आमदार मंगेशदादांनी हा चक्रव्हयू भेदण्याचा संकल्प केला… त्यांनी चाळीसगाव येथे आरटीओ कार्यालय मागणीची फाईल तयार करुन हा अत्यावश्यक मुद्दा अधोरेखित केला. थेट मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्यासमोर आरटीओ कार्यालयाबाबत मुद्देसूद मांडणी केली. राज्य शासन व परिवहन विभागाकडे या समस्येचा सांगोपांग आढावा मांडून आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या गूळगोड स्वभावाने विशेष बाब म्हणून आरटीओ कार्यालय मंजूर करुन घेतले.
मोठ्या अविरत पाठपुराव्यानंतर अखेर दि.२३ फेबुवारी २०२४ रोजी राज्य शासनाच्या गृह विभागाने शासन निर्णय प्रकाशित करून चाळीसगाव तालुक्यासाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली व चाळीसगाव तालुक्यातील पुढील नवीन सर्व वाहनांसाठी MH 52 हा नवीन पासिंग क्रमांक असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्रात एम.एच. ५० कराड नंतर गेल्या १३ वर्षात असे पहिलेच कार्यालय विशेष बाब म्हणून मंजुर झाले आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यामुळे चाळीसगावची नवी ओळख आता महाराष्ट्रच नव्हे तर देश पातळीवरही होत आहे. एमएच ५२ हा केवळ एक क्रमांक नसून चाळीसगावातील साडेचार लाख लोकसंख्येची खणखणीत अस्मिता आहे. आमदार मंगेशदादांनी आपल्या समाजहितैषी व्यक्तिमत्वाने तिला नव्या उंचीवर विराजमान केले आहे. आरटीओ कार्यालयामुळे चाळीसगावच्या अर्थोन्नतीला बळकटी मिळणार असून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. नामदार गिरीशभाऊ यांच्या तालमीत तयार झालेला आमदार मंगेशदादांसारखा लोकनेताचं असे शिवधनुष्य सक्षमपणे पेलू शकतो, हेच खरे. जिथे जिथे विषय गंभीर…तिथे मंगेशदादा खंबीर होऊन पुढे येतात.
दि.७ मार्च २०२४ रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीषभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते व पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत चाळीसगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दैदिप्यमान शुभारंभ सोहळा संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते नवीन वाहनांना MH52 क्रमांकाची नंबर प्लेट देण्यात आली. जे अनेकांना १५ वर्षात जमले नाही ते स्वप्न अवघ्या १५ दिवसात आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्यक्षात आणले. या ऐतिहासिक कामगिरी बद्दल भाजपा महायुती सरकार व आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे जाहीर आभार मानतांना आरटीओ कार्यालयाच्या वाटचालीस समस्त चाळीसगावकरांना मनापासून शुभेच्छा, जय हिंद… जय महाराष्ट्र..!