चाळीसगाव (प्रतिनिधी) विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशनात मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात चाळीसगाव मतदारसंघाला पुन्हा एकदा १५६ कोटी इतका भरीव निधी मिळविण्यात आमदार मंगेश चव्हाण यांना यश मिळाले असून लक्षवेधी कामगिरी ठरली आहे. विशेषता तालुक्यातील सिंचन, रस्ते, पूल, शासकीय इमारत आदी सर्वच विभागात निधी मिळाल्याने सिंचन क्षमता वाढणार असून दळणवळनाला गती मिळणार आहे. त्यात विशेषतः तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या वरखेडे लोंढे प्रकल्पाच्या कामाला १०० कोटी, गिरणा धरणावरील पांझण डावा कालवा दुरुस्ती साठी १९ कोटी ५४ लाख तसेच मन्याड धरणावरील मन्याड उजव्या कालव्याच्या दुरुस्ती कामांना १४ कोटी ५६ लाख असा भरघोस निधी मिळाला आहे. वरखेडे धरणाच्या १०० कोटी निधीचा वापर धरणाच्या बंदिस्त पाईपलाईन काम तसेच तामसवाडी गावाचे पुनर्वसन आदी कामांसाठी करता येणार आहे. यासोबतच पांझण व मन्याड कालव्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने जवळपास दोन आवर्तने कमी होऊन शेवटच्या बांधापर्यंत पाणी पोहोचणे देखील अवघड झाले आहे त्यामुळे या दोन्ही कालव्यांची ठिकठिकाणी दुरुस्ती, सिमेंट अस्तरीकरण केले जाणार असल्याने शेतकऱ्यांना १ आवर्तन अधिक मिळण्यात मदत होणार असल्याने चाळीसगाव तालुक्यातील शेतीक्षेत्राचे सिंचन वाढणार असल्याची माहिती चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
आपल्या मागणीवरून भरघोस अश्या निधीची तरतूद केल्याबद्दल आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे तसेच महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
तितूर नदीवर पातोंडा ते मुंदखेडा दरम्यान तसेच चाळीसगाव शहरातील इच्छादेवी येथे बनणार नवीन पूल, दोन नवीन रस्त्यांना देखील मंजुरी
पातोंडा मुंदखेडा रस्त्यावर तसेच चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड ते इच्छादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तितूर नदीवर अरुंद व कमी उंचीचे पूल असल्याने पूर आल्यावर वाहतूक बंद पडत होती. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी उंच व मोठे पूल बांधण्यात यावेत अशी मागणी केल्या अनेक वर्षांपासून केली जात होती, मात्र आजवरच्या कोणत्याही लोकप्रतिनिधी ला यासाठी निधी मिळवता न आल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांचे हाल कायम होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी पातोंडा मुंदखेडा रस्त्याची दर्जोन्नती करून सदर रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मान्यता मिळवून दिली, त्यामुळे या अर्थसंकल्पात पातोंडा गावाजवळील तितूर नदीवरील पुलाला ७ कोटी, तसेच इच्छादेवी पुलाला देखील ३ कोटी ५० लाख असा भरीव निधी इतका भरीव निधी मंजूर झाला आहे,
यासोबतच चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर पिंप्री ते तळेगाव रस्त्याला १ कोटी २० लाख, पोहरे ते खेडगाव – बहाळ रस्त्याला २ कोटी, रामनगर – पिंपळवाडी रस्त्यावरील पांझण कालव्यावरील रस्त्यावर नवीन रुंद पूल – १ कोटी, ओढरे गावाजवळ पुलाला १ कोटी ५० लाख असा निधी मंजूर झाला आहे.
चाळीसगाव सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळणार नवीन इमारत, तालुक्यातील ६४ मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांना उपलब्ध होणार फर्निचर
सद्यस्थितीत चाळीसगाव तालुक्यात शेकडो कोटींच्या शासकीय इमारती, रस्ते, पूल यांची कामे सुरु आहेत, मात्र हि कामे ज्या शासकीय यंत्रणेमार्फत सुरु आहेत त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चाळीसगाव उपविभागाला प्रशस्त व सोयी सुविधायुक्त इमारत नसल्याने तिथे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची गैरसोय होत होती. या अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी २ कोटी १४ लाख निधी मंजूर झाला आहे. यासोबतच तालुक्यातील ८ मंडळ अधिकारी कार्यालय बांधकामासाठी देखील १ कोटी २० लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. मागील काळात आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील ५६ तलाठी सजा यांना स्वताची कार्यालय मंजूर करण्यात आली असून त्यांची कामे देखील पूर्ण होत आली आहेत. या ५६ तलाठी कार्यालयांसह नवीन ८ मंडळ अधिकारी कार्यालय अश्या एकूण ६४ कार्यालयांना फर्निचर उपलब्ध करून देण्यासाठी देखील २ कोटी निधी मिळाला आहे.
मंजूर कामे व मिळालेला निधी खालीलप्रमाणे :-
१) मन्याड धरणाचे प्रूच्छ कालवाचे धूप प्रतिबंधक उपाय योजना – ४ कोटी ९० लाख
२) मन्याड उजव्या मुख्य कालव्याच्या कि.मी ०६ ते २० शाखे अंतर्गत विशेष दुरुस्ती – ४ कोटी ८५ लाख
३) मन्याड उजव्या कालव्याच्या टाकळी कि.मी. ० ते ५ शाखेअंतर्गत विशेष दुरुस्ती – ४ कोटी ८१ लाख
४) पांझण डावा कालव्याच्या कळवाडी शाखेतर्गत वितरीका क्र. ३, ३ A व ६ मधील विशेष दुरुस्ती – ४ कोटी ८४ लाख
५) पांझण डावा मुख्य कालव्याच्या वितरीका कि.मी. ४३ ते ५३ मधील विशेष दुरुस्ती – ४ कोटी २२ लाख
६) पांझण डावा मुख्य कालव्याच्या वितरीका क्र. ७ व १० कामांची विशेष दुरुस्ती – ३ कोटी ९० लाख
७) पांझण डावा मुख्य कालव्याच्या वितरीका क्र. १२ व जुवार्डी मधील विशेष दुरुस्ती – ३ कोटी ३७ लाख
८) पांझण डावा मुख्य कालव्याच्या वितरीका क्र.९ या कामांची विशेष दुरुस्ती – ३ कोटी २१
९) पातोंडा गावाजवळ मुंदखेडा रस्त्यावर पुलाचे जोडरस्त्यासह बांधकाम करणे – ७ कोटी
१०) इच्छादेवी मंदिरजवळ पुलाचे बांधकाम करणे – ३ कोटी ५०
११) सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चाळीसगाव येथे कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करणे – २ कोटी १४ लाख
१२) चाळीसगाव तालुक्यातील ५६ तलाठी व ८ मंडळ अधिकारी कार्यालय सुशोभीकरण व अनुषंगिक कामे – २ कोटी
१३) पोहरे ते खेडगाव ते बहाळ रस्ता रुंदिकरणासह सुधारणा करणे – २ कोटी
१४) ओढरे गावाजवळ पुलाचे जोडरस्त्यासह बांधकाम करणे – १ कोटी ५० लाख
१५) चाळीसगाव तालुक्यातील ८ मंडळ अधिकारी कार्यालयाचे बांधकाम करणे – १ कोटी २० लाख
१६) पिंप्री प्रचा ते तळेगाव रस्ता सुधारणा करणे – १ कोटी २० लाख
१७) पिंपळवाडी ते रामनगर दरम्यान कनॉल वरील पुलाचे बांधकाम करणे – १ कोटी