मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन आज पार पडणार आहे. परंतु, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भूमिपूजनाचा निमंत्रण देण्यात आले नाही. तर दुसरीकडे भूमिपूजनाच्या मुद्यावरून मनसे नेते यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून शिवसेनेला टोला लगावला आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे माध्यमांद्वारे थेट प्रसारण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मात्र कार्यक्रमापूर्वीच यावरून वादंग निर्माण झालं आहे.
एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण नसल्याने भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे मनसेनेही मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून शिवसेनेला टोला लगावला आहे. संदीप देशपांडे म्हणतात की, स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही असं सांगत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रण न दिल्याचं समोर आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच ठाकरे स्मारकाची घोषणा झाली होती. स्मारकासाठी अनेक परवानग्या देखील त्यांच्याच कार्यकाळात मिळाल्या. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानंतर कागद हस्तांतरण कार्यक्रम पार पडला होता, मात्र आता या स्मारकाचं भूमिपूजन होत असताना देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचं दिसतंय.
गेल्या अनेक दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं काम रखडलं होतं, या स्मारकासाठी मुंबईच्या महापौराचं निवासस्थान ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र याठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका पार पडतात, स्मारक अद्याप झालं नाही, शिवसेनेची सत्ता येऊनही काम रखडलं आहे, शिवसेनेला महापौर बंगला बळकवायचा होता अशी टीका सातत्याने मनसेकडून केली जात होती, त्यानंतर आता या स्मारकासाठी ४०० कोटींचा निधी देण्यात आला असून आज स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन होत आहे.