अमरावती (वृत्तसंस्था) अंजनगावसुर्जी येथील एका मंगल कार्यालयात हळदी समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या मुलींचे कपडे बदलवित असताना एका भामट्याने चोरून मोबाईलने चित्रीकरण केल्याची संतापजनक घटना बुधवारी रात्री उघडली. वऱ्हाड्यांकडून सदर तरुणाला पकडून बेदम चोपले. मोहंमद फुजेल मोहंमद शौकत (वय २३), असे मुली कपडे बदलविताना चित्रीकरण करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
याबाबत स्थानिक माध्यमांमध्ये प्रकाशित वृत्तानुसार अंजनगावातील एका प्रतिष्ठित कुटुंबातील मुलीचा विवाह तेथीलच एका मंगल कार्यालयात आयोजित होता. ७ जून रोजी रात्री हळदीच्या कार्यक्रमात फिर्यादी महिलेच्या घरातील मुलीदेखील सहभागी झाल्या होत्या. बुधवारी रात्री आठच्या सुमारास त्या मुली मंगल कार्यालयातील एका खोलीत तयार होत होत्या. त्यावेळी एका तरुणाने खिडकीतून चोरून त्या मुलींचा कपडे बदलवीत असतानाच व्हिडीओ रेकार्ड केला.
दोन- तीन वऱ्हाड्यांनी त्याला व्हिडीओ तयार करतांना पाहिले. त्यामुळे काही तरुणांनी त्याचा मोबाइल तपासला असता त्यात क्षणभरापूर्वी केलेल्या मुलींची रेकार्डिंग दिसून आली. त्यामुळे जमावाने त्याला जबर मारहाण केली. आरोपी तरुण मार बसल्यानंतरही ओळख लपवित होता. मात्र, पोलिसी खाक्या बसताच त्याने स्वतः ची ओळख सांगत तीन मोबाइलदेखील काढून दिले. यानंतर मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरून अंजनगावसुर्जी पोलिसांनी संशयित मोहंमद फुजेल मो. शौकतविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मो. फुजेल याला अंजनगावसुर्जी पोलिसांनी गुरुवारी (ता. आठ) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
















