चाळीसगाव (प्रतिनिधी) व्हॉट्सअॅपवर लग्नाचे आमंत्रण अर्थात विडिंग इन्व्हीटेशन या नावाखाली एपीके फाईल पाठवून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार चाळीसगाव शहरात समोर आले आहेत. ही फाईल डाउनलोड होताच मोबाईल हँग होतो आणि मोबाईलचा पूर्ण कंट्रोल हॅकरच्या ताब्यात जातो, अशी माहिती सायबर तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.
तालुक्यात २ दिवसापासून या हॅकरला बरेच जण बळी पडले आहेत. अनेकांचे मोबाईल हॅक करून बँकेतून पैसे गहाळ करण्यात आले आहेत. यामुळे बँकेतील मोठे व्यवहार बँकेने थांबवल्याचे समजते. तर धनादेश, आरटिजीएस असे सर्व व्यवहार बँकेने सेवा सुरळीत होईपर्यंत थांबवल्याचे सांगण्यात येत आहे. या लिंकमुळे मोबाईलमधील सर्व अॅप्स, बँक अकाउंट्स व वैयक्तिक माहिती धोक्यात येते. बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर होण्याचे अनेक जणांच्या ओरड येत आहेत. कुणीही मोबाईलमधील लग्नाच्या निमंत्रणाची फाईल उघडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस दलाने नागरिकांना, अशा कोणत्याही फाईल्स अजिबात डाउनलोड करू नयेत, असे आवाहन केले आहे. तर नागरिकांनी जागरूक राहून संशयास्पद मेसेज अथवा फाईल्स त्वरित डिलिट कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.