बंगळूर (वृत्तसंस्था) कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. मोदी लाट लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी मदत करू शकते, परंतु राज्यातील निवडणुकात नाही, असं मत येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं आहे.
भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक बंगळूरमध्ये झाले. या बैठकीला येडियुरप्पा यांनी मागर्दर्शन केले. मोदी लाटेमुळे लोकसभा निवडणुकीत यश मिळण्यास मदत होईल परंतु, राज्यातील निवडणुकात नाही, असे त्यांनी सुनावले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रात चांगले काम करीत आहेत. ते पुढील निवडणुकीनंतर पुन्हा पंतप्रधान बनतील. परंतु, राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस जागी झाली आहे. विरोधी पक्ष आता पुढील रणनीती आखू लागले आहेत. आपण आणखी कठोर मेहनत करण्याची आवश्यकता आहे. पक्षाने आता बूथ पातळीवरुनच लक्ष घालायला हवे. असे केले तरच आपण काँग्रेसला धडा शिकवण्यात यशस्वी होऊ. हनेगळ आणि सिंदगी या पोटनिवडणुका जिंकणे सोपे नाही. ही आपल्यासाठी अग्निपरीक्षा आहे. आपण विकासाच्या मुद्द्यावरच भर द्यायला हवा.