फैजपूर (प्रतिनिधी) केंद्रातले मोदी सरकार हे इंग्रजांपेक्षाही अत्याचारी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केली. पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी नाना पटोले हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. जिल्ह्यातील फैजपूर येथे नवीन कृषी कायद्यांची होळी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
सत्ता ही लोकांच्या सुरक्षेसाठी असली पाहिजे, दुराचारासाठी नाही. पण भाजपने ज्या पद्धतीने देशात दुराचार माजवला आहे. त्या विरोधात आज सामान्य जनता तसेच काँग्रेस जन अशा सर्वांच्या मनात आग पेटली आहे. उद्या ही आग बाहेर आली तर भाजपला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही. केंद्रातले मोदी सरकार हे इंग्रजांपेक्षाही अत्याचारी आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आज भाजपवर केली. नाना पटोले पुढे म्हणाले, केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने कोरोनाची दुसरी लाट उसळली. त्यात अनेकांचे जीव गेले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला राज्य सरकारने सक्षमपणे तोंड दिले. सामूहिक प्रयत्नांमुळे दुसरी लाट ओसरली. आता तरी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
अत्याचारी केंद्र सरकारची ५ वर्षे संपण्याची वाट जनता पाहतेय
केंद्रातील अत्याचारी मोदी सरकारने जे कृषी विषयक तीन काळे आणले, त्या कायद्यांचे दहन करण्यासाठी मी फैजपुरात आलो आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेतकरी या कायद्यांना विरोध करत आहेत. फैजपूर ही पावन भूमी आहे. याच भूमीतून काँग्रेसने त्या काळात इंग्रजांच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी ५०वे अधिवेशन घेतले होते. त्याची प्रतिकृती म्हणून आज केंद्रात जे भाजपचे सरकार आहे, ते इंग्रजांपेक्षाही अत्याचारी आहे. त्यांनी आणलेल्या कायद्यांचे आज दहन केले आहे. पाशवी बहुमताच्या आधारावर मोदी सरकार देशाची आर्थिक व्यवस्था, शेतकरी, बेरोजगार आणि गरिबांना संपवण्याचे काम करत आहे. हे लोक बघत आहेत. या अत्याचारी सरकारची ५ वर्षे संपण्याची वाट देशातील जनता पाहत आहे. २०२४मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला.