मुंबई (वृत्तसंस्था) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या ग्राहकांना मोठा लाभ मिळू शकतो. कर्माचऱ्यांच्या किमान पेन्शन (Minimum Pension) रकमेत वाढ होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. या संदर्भात शासनाकडून तयारी केली जात आहे. आता किमान मासिक पेन्शन १ हजार रुपयांवरून ९,००० रुपये केली जाऊ शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या कामगार मंत्रालयाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. या बैठकीत नवीन संहिता आणण्याचा विचारही केला जात आहे. कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेंतर्गत किमान पेन्शन वाढवणे हा या बैठकीचा मुख्य अजेंडा असून त्यावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.
दीर्घकालीन मागणी
निवृत्तिवेतनधारक अनेक दिवसांपासून किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत. याबाबत कामगार मंत्रालयाच्या अनेक बैठका व चर्चा झाल्या आहेत. याशिवाय संसदेच्या स्थायी समितीनेही यासंदर्भात सूचना केल्या आहेत. फेब्रुवारीच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते, असे मानले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कामगार संघटनांनी विद्यमान किमान पेन्शन १,००० रुपयांवरून ९,००० रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे, तर सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी किंवा CBT ते ६,००० रुपयांपर्यंत वाढवू शकते. ईपीएफओचे पैसे खाजगी कॉर्पोरेट बाँडमध्ये गुंतवण्याचा वादग्रस्त मुद्दाही बैठकीत चर्चेचा विषय असेल. तसेच २०२१-२२ साठी पेन्शन फंडाचा व्याजदर काय असावा या मुद्द्यावरही निर्णय घेतला जाऊ शकतो.