नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभेत राहुल गांधींचं बजेटसंदर्भात भाषण केलं आहे. पेगाससच्या मुद्यावरुनही राहुल गांधींनी थेट पंतप्रधान मोदींवरच आसूड ओढले आहेत. त्यांनी असा आरोप केला आहे की, इस्रायलला जाऊन स्वत: मोदींनीच भारतात पेगासस आणलं आहे.
राहुल गांधींनी म्हटलंय की, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, पेगासस, ही सर्व राज्यांच्या संघराज्याचा आवाज नष्ट करणारी, लोकांचा आवज नष्ट करणारी साधने बनवली गेली आहेत. जेंव्हा तुम्ही भारतातल्या राजकारण्याविरोधात पेगाससचा वापर करता, ज्या पेगासससाठी पंतप्रधान मोदी स्वत: इस्रायलला गेले. त्यांच्या सांगण्यावरुनच पाळत ठेवली गेली आहे. त्यांनी भारतातील संघराज्यावरच हल्ला केला आहे. पेगाससच्या माध्यमातून अनेक राज्यांतील लोकांवर ही पाळत ठेवण्यात आली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, एका विशिष्ट विचारधारेने संपूर्ण सगळ्या यंत्रणांवर ताबा मिळवला आहे. त्यांनी देशात द्वेषाचं विष कालवलं आहे. आणि द्वेषामुळे काय होतं, हे चांगल्या पद्धतीने जाणतो कारण माझ्या आजोबांनी १५ वर्षे तुरुंगात घातली आहेत. माझी आजी माझ्या बाबांनी रक्त सांडलं आहे. म्हणून मला हे आतून जाणवतं की किती धोकादायक आहे. माझा सल्ला आहे की हे आता थांबवा. तुम्ही आधीच अडचणी तयार करण्याला सुरुवात केली आहे.
संघ आणि भाजप हे आपल्या देशाची पाळेमुळे कमकुवत करत आहेत. ते आपल्या राज्याची एकता नष्ट करत आहेत. एकाही तरुणाला रोजगार मिळणार नाही, अशी व्यवस्था करुन ते देशाला कमकुवत करणार आहेत. प्रजासत्ताक दिनाला एकही पाहुणा का मिळाला नाही, याचं तुम्ही आत्मपरिक्षण करा. आज भारत पूर्णपणे एकटा पडला आहे. श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनकडून आपण वेढले गेलो आहोत आणि आपण एकटे पडले आहोत. आपण कमकुवत झालो आहोत. देशातील लोकांमध्ये संवाद संपत चालला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.