साकेगाव ता.भुसावळ (प्रतिनिधी) गेल्या काळात मंत्री असताना पक्ष पाहिला नाही. मोदींनी सांगितलं गुलाब महाराष्ट्रात सर्वांना पाणी पाज, त्यानुसारच मोदी सरकारची ‘हर घर जल और हर घर नल’ ही योजना राबवून मोदींची स्वप्नपूर्ती साकारत असल्याचं वक्तव्य राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. साकेगाव येथील पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी अनेक दिवसानंतर पहिल्यांदाच एका व्यासपीठावर गुलाबराव पाटील व भाजपचे मंत्री गिरीश महाजन उपस्थित असल्याचे पाहायला मिळालं. लोकांनी निवडून दिलेलं पद हे आमदाराचं पद असतं, त्यामुळे पक्षीय मतभेद असले तरी लोकांनी ते सर्वमान्य केलेलं असल्यामुळे काम करण्याची जबाबदारी असते व तेच मी करतोय. आमचं ७५ टक्के आयुष्य हे विरोधात गेलंय मात्र मुंजोबा, पिरोबा सारखी भूमिका देवानं आपल्याला दिलीय. देवाकडे जातात त्या पद्धतीने लोक आपल्याकडेही येतात.
आपल्या दारी येणाऱ्या प्रत्येकाचं काम करण्याचं भाग्य आपल्याला देवाने दिले असल्यामुळे आपण लोकशाहीतले देव असल्याचेही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. दरम्यान, शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असून राजकीय अधिकारात कोणी हात टाकल्यास त्याचा राजकीय प्रवास भस्मसात होईल, असं जाधव म्हणाले होते, त्यावर आता पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना कोणाची आहे, यापेक्षा शिवसेना वाचवली कोणी, हे सर्वात महत्त्वाचे आहे. शिवसेना वाचवण्यासाठी सर्वात मोठे काम कोणी केले असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, असं गुलाबराव पाटील म्हणाले. लोक जेव्हा जळगाव शहरातल्या खड्डयांबद्दल बोलून दाखवतात, तेव्हा आम्हाला आमची लाज वाटते अशी खंत यावेळी गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.