जळगाव (प्रतिनिधी) दहा टक्के व्याजाने घेतलेल्या पैशांच्या वादातून सावकाराने महेश अशोम मराठे (वय ४४, रा. चौघुले प्लॉट, शनिपेठ) यांना सोबत घेवून गेला. त्याठिकाणी अश्लिल शिवीगाळ करीत प्लास्टीकच्या पाईपने बेदम मारहाण केली. ही घटना दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास कोंबडी बाजार परिसरात घडली. यामध्ये तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी सागर सपके राधेश्याम शर्मा यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील चौघुले प्लॉट परिसरात राहणारे महेश मराठे यांचा सौंदर्य प्रसाधने विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी सन २०१६ मध्ये व्यावसायाकरीता सागर सपके याच्याकडून दहा टक्के महिना व्याजाने ९० हजार रुपये घेतले होते. दर महिना ९ हजार रुपये प्रमाणे ते व्याज देत होते. त्यानंतर मराठे यांनी घेतलेली ९० हजार रुपये चार टप्प्यांमध्ये देखील परत केले होते. दरम्यान, दि. २८ रोजी महेश मराठे हे कामानिमित्त मित्र चेतन राजेंद्र कासार याला गोलाणी मार्केटमध्ये भेटण्याकरीता जात होते. त्यावेळी (एमएच १९, बीवाय ११११) क्रमांकाच्या बुलेटवरुन जात असलेल्या सागर सपके व त्याचा साथीदार राधेश्याम शर्मा यांनी आवाज देवून थांबवले.
जबदस्ती बसवून घेवून गेले सोबत
आवाज देवून थांबवल्यानंतर सागर सपके याने शिवीगाळ करीत महेश मराठे यांना जबरदस्तीने बुलेटवरुन कोंबडी बाजार परिसरात त्यांच्या घराजवळ घेवून गेले. राधेश्याम याने पत्र्यावर ठेवलेला प्लास्टीकच्या नळाचा पाईप काढून आणला. त्यानंतर सागर सपके याने मराठे यांना बेदम मारहाण केली.
जीव वाचविण्यासाठी करु लागला विनवनी
या मारहाणीत महेश मराठे यांच्या पाठीवर, हातावर व पायावर मारहाण केल्यामुळे गंभीर दुखापत झाली. तसेच पैसे न दिल्यास मारुन टाकू अशी धमकी देखील ते देत होते. मराठे यांनी जीव वाचविण्याकरीता राहिलेले पैसे देवून टाकतो, परंतू मला मारु नका अशी विनवनी करु लागला. दरम्यान, मराठे यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन सागर सपके व राधेश्याम शर्मा रा. अयोध्या नगर यांच्याविरुद्ध गुनहा दाखल करण्यात आला आहे.
















