बीड (वृत्तसंस्था) बीडच्या (Beed) अंबाजोगाई शहरात एका अल्पवयीन मुलीवर 35 वर्षीय नराधम व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. घरामध्ये अल्पवयीन मुलगी एकटीच झोपली असता तिच्या आईच्या मित्रानेच लैंगीक अत्याचार केला आहे. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आरोपी दत्ता जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील रहीवासी असलेल्या 35 वर्षीय महिला शहरातील एका प्रभागांमध्ये किरायाच्या खोलीमध्ये राहत आहेत. ती मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. सदरील महिलेच्या मित्राचे तिच्याकडे बऱ्याच वर्षापासून येणे जाणे होते. दोन दिवसांपूर्वी सदरील महिलेची अल्पवयीन मुलगी घरात एकटीच झोपली होती. यावेळी नराधम आरोपी दत्ता शिवाजी जाधव (वय 35 रा. वाघाळवाडी) याने, पीडित मुलीची आई ही कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधत, अल्पवयीन मुलीस तिच्यावर वाईट हेतूने स्पर्श करत व लज्जा उत्पन्न होईल असा तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आहे.
सदरील घटना पीडितेने आई परत आल्यावर आपल्या आईस सांगितल्याने, आईच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आरोपी दत्ता जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या अंबाजोगाई शहरात, ही संतापजनक घटना घडल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
















