चंद्रपूर (वृत्तसंस्था) चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना या छोट्याश्या गावातील एका आईची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. चर्चेमागं कारणही अगदी तसंच आहे. जुनोना गावात राहणाऱ्या अर्चना संदीप मेश्राम या माऊलीने एका भल्यामोठ्या वाघाच्या जबड्यातून आपल्या मुलीला बाहेर काढत तिचा जीव वाचवला आहे.
सडपातळ बांधा असणारी वयाची तिशी सुद्धा न गाठलेली ही जंगलानजीक राहणारी अर्चना मेश्राम. तिची पाच वर्षाची मुलगी प्राजक्ता, जिच्या चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर आणि डोळ्याच्या आजूबाजूला नुसत्या इजाच नाही तर हाडंपण तुटली आहेत. जंगलानं वेढलेल्या या गावात राहणाऱ्या लोकांना अजूनही फारशी शौचाची सोय नाही आणि त्यामुळे वाघ, अस्वल यांना न जुमानता गावालगतचं जंगल गाठावं लागतं. असंच आईचा पाठलाग करत जंगलात गेलेल्या या चिमुकलीला चक्क एका मोठ्या वाघानं तोंडांत पकडून फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आजूबाजूला मदतीसाठी कोणीही नव्हते. या चिमुकलीचे प्राण वाचवण्यासाठी आईने धाडस करत बांबूच्या साहाय्याने मुलीला वाघाच्या तावडीतून सोडवले.
घटनेनंतर जखमी अवस्थेतील बेशुद्ध प्राजक्ताला घेऊन आईने तातडीने रुग्णालय गाठले. चंद्रपुरात उपचार झाल्यावर सध्या प्राजक्ता नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात चेहऱ्याच्या पक्षाघातावर उपचार घेत आहे. मातेच्या निग्रही प्रतिकारापुढे बिबट्यालाही पळ काढावा लागला. डॉक्टर्स ती स्वस्थ व्हावी यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहेत.