अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात लवकरच नवीन प्रस्तावित प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे. यासाठी शासन स्तरावरून देखील हालचालीना वेग आला असून शहरातील पाच पावली मंदिराजवळील पोलीस लाइनच्या जागेवर महसूलची नवीन प्रशासकीय इमारत बनावी, यासाठी आ. अनिल पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीव वर्मा यांनी अमळनेरचा दौरा करून संबंधित क्षेत्राची पाहणी केली.
जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून महसूल विभागाची प्रशासकीय इमारत तसेच इतर कार्यालये एका ठिकाणी असणं गरजेचं असल्याकारणाने शहरात लवकरच नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला सुरवात होणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. या कामासाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी अधिवेशनात १४ कोटी १७ लाखांची मान्यता देखील दिलेली आहे. पण त्यासाठी महसूल विभागाकडून जागेची जी निवड केली गेली होती. ती शहराबाहेर असल्याने तिथे जर इमारत बांधली गेली तर सामान्य लोकांची गैरसोय होऊ शकते. यासाठी शहरातच असलेल्या पाचपावली चौकातील जुन्या पोलीस लाईनीच्या जागेचा प्रस्ताव मंत्रालय बैठकीत मांडलेला आहे.
पोलीस स्टेशन शहराबाहेर असल्याने तसेच त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने देखील उपलब्ध करून दिली असल्याने शहरातील जुन्या पोलीस लाईनीची जागा महसूल विभागाला मिळावी. यासाठी पोलीस विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आलेला असून यावर मंत्रालयीन स्तरावर चर्चा करून गृहमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार अतिरिक्त महासंचालक यांनी शहराला भेट देऊन आढावा घेतला. याचा वस्तूनिष्ठ अहवाल तयार करून मंत्रालयीन बैठकीत सादर केला जाणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश चोपडे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक ऋषीकेश रावल, प्रांताधिकारी सीमा अहिरे उपस्थित होत्या.
शहर पोलीस स्टेशनसाठी हालचाली सुरू
अमळनेर तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठं असल्याने तालुक्यासाठी शहर व तालुका पोलीस स्टेशन स्वतंत्र असावेत ही मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यातच असलेले पोलीस स्टेशन हे शहरापासून ३ ते ४ किलोमीटरच्या अंतरावर आहे. मारवड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ग्रामीणचा काही भाग सांभाळण्यास मदत होत असते. मात्र गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याने आता शहरात स्वतंत्र शहर पोलीस स्टेशनची मागणी जोर धरू लागली आहे. याचाच भाग म्हणून हल्लीच्या प्रशासकीय इमारतीच्या जागेवर शहर पोलीस स्टेशन उभारण्यासाठी आमदार अनिल पाटील यांच्याकडून पाठपुरावा होत असून शहर पोलीस स्टेशन झाल्यास गुन्हेगारीवर वचक बसेल.