औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादचे एमआयएमचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जलील यांनी स्वत: ट्विट करून आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.
पाच दिवसांपूर्वी गुजरात राज्यातील महापालिका निवडणुकीत त्यांचा प्रचार दौरा होता. तो आटोपून ते औरंगाबाद शहरात दाखल झाले होते. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते घरातच होते. त्यांनी स्वतःची कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. तसेच, संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन खासदार जलील यांनी केले आहे.
कोरोनाची लागण झालेल्या राज्यातील बड्या नेत्यांमध्ये आता औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे सरकारमधील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, छगन भुजबळ, जयंत पाटील, बच्चू कडू, एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे यांचा समावेश आहे.
गेल्या २४ तासांत ५,२१० नव्या रुग्णांची नोंद
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा सोमवारी काहीसा कमी आल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सोमवारी कोरोनाचे ५ हजार २१० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ५ हजार ३५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर १८ कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १९ लाख ९९ हजार ९८२ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४.९६ टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा २.४६ टक्क्यांवर आहे.