मुंबई (वृत्तसंस्था) येत्या २ जानेवारी रोजी राज्यभर होऊ घातलेल्या एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा (Maharashtra Public Service Commission Pre-Examination) पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा (Exam) होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांना संधी मिळावी म्हणून ही पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच नवं वेळापत्रक जाहीर होणार आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी परीक्षा पुढे ढकलल्याने काही उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडल्याने संधी हुकली होती. अशा उमेदवारांना परीक्षेस बसण्याची संधी देण्यासाठी सरकारकडून निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २ जानेवारी २०२२ रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाने पत्रक काढून ही माहिती दिली आहे.
कोरोनामुळे मागील वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा झाली नाही. त्यामुळे ज्यांची वयोमर्यादा मागील वर्षी संपत होती ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकले नव्हते. सरकारने आणि आयोगाने अशा विद्यार्थ्यांना आणखीन एक वर्ष ही परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परिक्षा नव्याने राबवावी लागणार आहे. मागील वर्षी शेवटची संधी असलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षीच्या परिक्षा प्रक्रियेत सहभागी करून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे दोन जानेवारीला होणारी ही परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. परीक्षेचं नवं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असं आयोगने म्हटलं आहे. पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अशा ३९० पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती.