मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर पोलिसांनी (muktainagar police) आज सलग दुसऱ्या दिवशीही ‘वॉश आऊट’ मोहीम सुरूच ठेवली आहे. आज पहाटे पातोडी शेत शिवारात तीन ठिकाणी अवैध गावठी भट्टीवर धाड टाकत पोलिसांनी साधारण १ लाख २० हजाराची गावठी दारू नष्ट केली आहे.
आज सोमवार ११ एप्रिल रोजी पातोडी शिवारात तीन वेगवेगळ्या ठिकाणी गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास पोलीस उप निरीक्षक प्रदीप शेवाळे, राहुल बोरकर,पोहेकॉ. संतोष चौधरी,गणेश मनुरे, पो.ना.संतोष नागरे, संदीप खंडारे, गजमल पाटील, पोकॉ.रवींद्र धनगर, राहुल महाजन, रवींद्र चौधरी, विशाल पवार यांच्यासह तीन ठिकाणी धाडी टाकल्या. त्यापैकी एका ठिकाणी चालू हातभट्टीसह आरोपी ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून कच्चे व पक्के रसायन व गावठी हातभट्टीची तयार दारू व त्यास लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. साधारण १ लाख २० हजाराची दारू यावेळी जप्त करण्यात आलीय. याप्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, मुक्ताईनगर पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशीही ‘वॉश आऊट’ मोहीम सुरूच ठेवल्यामुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.