मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील सालबर्डी येथील रहिवासी असलेले दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मरण पावल्याची दुर्घटना रविवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केल्याचे दिसून आले.
सालबर्डी येथे कृष्णा ढाके हे आपली पत्नी व दोन मुलांसह वास्तव्यास आहेत. रविवार १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता त्यांची दोन मुले वेदांत कृष्णा ढाके (वय 15) आणि चिराग कृष्णा ढाके (वय 10) हे सालबर्डी शिवारात बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. यातील चिराग हा शिवारातील तलावाच्या पाण्यात उतरला असता गटांगळ्या घाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी वेदांत याने देखील पाण्याची उडी मारली. दुर्दैवाने दोन्ही भाऊ तलावात बुडले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सालबड शिवारात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्यामुळे तलाव निर्मित झाला असून याच तलावाने दोन अजाण बालकांचा बळी घेतला आहे.
सालबर्डी येथील ढाके कुटुंब हे गरीब असून वडील रिक्षा चालवून तर आई शेतमजुरी करून उदरनिर्वाह भागवतात. आज तलावात दोन्ही मुले बुडून मयत झाल्याने या कुटुंबावर वज्राघात झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबात मुक्ताइ्रनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.