मुंबई (प्रतिनिधी) औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा तापलेला असताना आता मुंबईत एक महत्त्वाचा बदल होणार आहे. पश्चिम रेल्वे स्थानकावरील मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचे नाव लवकरच ‘नाना शंकरशेठ सेंट्रल टर्मिनस’ असे होणार आहे. याबद्दल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रेल्वे विभागाला पत्र लिहून मागणी केली आहे.
मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेकडून सातत्यानं करण्यात येत होती. त्यावर आता केंद्र सरकारनं कार्यवाही सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. तसं पत्रच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना पाठवलं आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलून नाना शंकरशेठ टर्मिनस करावं अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून पाठपुरावा सुरु आहे. त्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना पत्र लिहिलं आहे. नामांतराबाबत सर्व यंत्रणांचा अहवाल प्राप्त झाला असून, केंद्र सरकार याबाबत कार्यवाही करत असल्याची माहिती त्यांनी सावंत यांना दिली आहे. यापूर्वी मुंबई सेंट्रलचं नाव नाना शंकरशेठ टर्मिनस करण्याबाबतचा ठरावर विधानसभेतही पारित झाला आहे.
मुंबईच्या विकासात नाना शंकरशेठ यांचे मोलाचे योगदान आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी फार जुनी आहे. राज्य सरकारने आधीच हा प्रस्ताव मंजूर केला आहे. आधीच या प्रस्तावाला विलंब झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडूनही कोणताही विलंब होण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे लवकरात लवकर या प्रस्तावावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब करावे, असं अरविंद सावंत म्हणाले.
कोण होते जगन्नात शंकरशेठ?
जगन्नाथ शंकरशेठ हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, तसंच एक उद्योगपती होती. ते थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी आणि आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक होते. त्याचबरोबर पहिल्या रेल्वेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.