पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) वाळूचे डंपर घेण्यासाठी माहेराहून वीस लाख रुपये हुंड्याच्या स्वरूपात घेऊन यावे यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला. आणि गळफास देऊन विवाहितेस जीवे मारून टाकल्याची घटना जंगीपुरा ता. जामनेर येथे आज दि. ८ रोजी पहाटेच्या सुमारास घडली. भाग्यश्री राहुल परदेशी ( वय २८) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्री २ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान पती राहुल परदेशीसह सासू रेखाबाई राजपूत, सासरे गोविंद राजपूत व दीर सुनील राजपूत यांनी संगनमताने गळफास देऊन जीवे मारून टाकल्याची फिर्याद विवाहितेची वडील सरदार बाबुलाल परदेशी (रा. पांगरा, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी दिली आहे.
भाग्यश्री राजपूत हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सासरच्या लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी माहेरच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला. विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल सासरच्या चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पती राहुल राजपूत व सासू रेखा राजपूत यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहाम यांनी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनीही घटनास्थळी धाव – घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे करीत आहेत.
 
	    	
 
















