जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील अजिंठा चौफुलीजवळील हॉटेल सपनाजवळ शुक्रवारी बेवारस अवस्थेत मृतदेह सापडला होता. मयत भाऊसाहेब अभिमान पवार (वय ५८, रा. पातोंडा, ता. अमळनेर) यांचा गळा आवळून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्रे फिरवित संशयित हुसेन शेख आयुब शेख (वय ३०, रा. ट्रान्सपोर्टनगर) याला ताब्यात घेत हा गुन्हा उघडकीस आणला. संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे राहणारे भाऊसाहेब पवार हे गेल्या सात वर्षापासून काशीबाई उखाजी कोल्हे शाळेजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करीत होते. त्यांची पत्नी सहा वर्षांपुर्वी मयत सकाळी झाली असून मुलगा पुण्यात नोकरीस आहे. दि. ९ रोजी भाऊसाहेब पवार हे अजिंठा चौफुलीजवळील हॉटेल सपन जवळ बेवारसरित्या मिळून आले होते. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाचा संशय
मयत भाऊसाहेब पवार यांची त्यांची शालकांनी ओळख पटविली. यावेळी त्यांनी मृतदेह निरखून बघितला असता, त्यांना त्यांच्या गळ्याजवळ ओरखडल्यामुळे लालसर झाल्याच्या जखमा दिसून आल्या. त्यामुळे त्यांना भाऊसाहेब पवार यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय आला.
गांर्भीय लक्षात घेत पथक रवाना
नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ अक्रम शेख, मुरलीधर धनगर, किशोर पाटील व राहुल कोळी यांचे पथक रवाना केले.
दिवसभर शोध घेतल्यानंतर सायंकाळी आवळल्या मुसक्या पोलिसांनी शहरातील अजिंठा चौक, ट्रान्सपोर्ट नगर, नेरी नाका स्टेशन, बस स्टॅण्डसह नशिराबाद ठिकाणी संशयित हुसेन शेख आयुब शेख याचा शोध घेतला. दरम्यान, संशयित हा ट्रान्सपोर्ट नगरात असल्याचे कळताच पथकाने सापळा रचत संशयित हुसेन शेख आयुब शेख याच्या मुसक्या अवळल्या. त्याला पुढील चौकशीसाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
















