नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘दैनिक भास्कर’च्या भोपाळसह देशभरातील अनेक कार्यालयावर प्राप्तीकर विभागाने छापा टाकला आहे. दरम्यान, कोरोना काळातील भयावह स्थिती जगासमोर मांडल्याने आणि पेगासस प्रकरणाचे रिपोर्टिंग केल्याने दैनिक भास्कर समुहाला टार्गेट केले जात असून माध्यमांची मुस्कटदाबी सुरु असल्याचा आरोप होत आहे.
मीडिया ग्रुप ‘दैनिक भास्कर’च्या देशभरातील अनेक कार्यालयांवर गुरुवारी सकाळी अचानक आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या पथकांनी दैनिक भास्कर समूहाच्या नवी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध कार्यालयांवर छापे टाकले. या कार्यालयांची झाडाझडती घेतली जात आहे. दैनिक भास्कर समूह हा देशातील प्रसिद्ध माध्यम समूहांपैकी एक आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, दैनिक भास्कर ग्रुपवर करचोरीचा आरोप आहे. तसंच ग्रुप प्रमोटर्सच्या घरांवरही आणि कार्यालयातही छापेमारी करण्यात आली.