मुंबई (वृत्तसंस्था) म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी ‘एसआयपी’ (SIP) हा पर्याय सर्वोत्तम ठरतो. म्युच्युअल फंड (Mutual Fund) एसआयपीमध्ये (SIP) तुम्ही नियमित अगदी लहान बचतीतूनही इक्विटीसारखे परतावे मिळवू शकता. जर तुम्ही तुमची छोटी बचत दर महिन्याला गुंतवण्याची सवय लावली तर पुढील काही वर्षांत तुम्ही लाखो रुपयांचा निधी सहज तयार करू शकता.
स्मार्ट मनी मेकिंगच्या माध्यमातून एखादी व्यक्ती १० रुपयांची गुंतवणूक करून आपली संपत्ती १० लाख रुपयांपर्यंत पोहोचवू शकते. रोज १० रुपयांची बचत केली, तर ती महिन्याला ३०० रुपये होते. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच ‘एसआयपी’मध्ये गुंतवणुकीचा पर्याय निवडला, तर पुढील ३० वर्षांत १० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम कमवू शकता. SIP मध्ये गुंतवणूकदारांना चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो आणि दीर्घ मुदतीत जास्त रिटर्न्स मिळण्याचीदेखील शक्यता असते.
एसआयपी म्हणजे काय?
एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे. या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. एसआयपी अगदी बॅंकेच्या आरडीसारखी (RD) असते. परंतु, त्यात बॅंकेपेक्षा चांगला रिटर्न मिळतो. दर महिन्याला तुमच्या बॅंक खात्यातून एक निश्चित रक्कम कापली जाते आणि ती एसआयपीमध्ये गुंतवली जाते.
दररोजची एसआयपी
व्यावसायिक किंवा जिथे दररोज उत्पन्न मिळतं, अशा व्यवसायाशी संबंधित व्यक्तींसाठी दररोजची एसआयपी हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. दररोजच्या एसआयपीमध्ये तुम्हाला मिळणारा रिटर्न हा फंड व्यवस्थापनावर म्हणजेच ते तुमचे पैसे कोणत्या फंडात गुंतवतात यावर अवलंबून असतो. लार्ज कॅप फंडातला रिटर्न हा एकसमान असतो, त्यामुळे अशा फंडातली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते.
साप्ताहिक एसआयपी
साप्ताहिक एसआयपीमधल्या गुंतवणुकीचा हप्ता तुमच्या बॅंक खात्यातून महिन्यातून चार वेळा कापला जातो. यात तुम्ही छोटी रक्कम गुंतवत असता. यामुळे मार्केटची जोखीम कमी होते. जेव्हा बाजार डाउन असतो तेव्हा साप्ताहिक एसआयपीमधून जास्त युनिट्स मिळतात.
मासिक एसआयपी
लहान गुंतवणूकदार आणि नोकरदार वर्गासाठी मासिक एसआयपी हा सर्वोत्तम पर्याय आहे. याचं व्यवस्थापन खूप सोपं असतं. या माध्यमातून तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करू शकता.
















