जळगाव (प्रतिनिधी) ‘मविप्र’च्या वादातून दाखल गुन्ह्यात पुणे पोलिसांचे पथक आज सकाळ पासून पाच वेगवेगळ्या ठिकाणी झाडा-झडती घेत आहे. एका ठिकाणी झाडाझडती घेण्यासाठी पथक गेले असता घराला कुलूप होते. परंतु कुलूप उघडल्यावर घरात महिला आढळून आल्यामुळे काही वेळसाठी पोलीसही चक्रावले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘मविप्र’च्या वादातून अॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांविरुद्ध ९ डिसेंबर २०२० रोजी फिर्याद दिली होती. याप्रकरणी आज सकाळी कोथरूड पोलिसांचे पथक जळगावात येऊन धडकल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने आज एसीपी सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाच ठिकाणी झाडाझडती सुरु केली आहे. आज सकाळी ९ वाजेपासून तर सायंकाळचे ६ वाजेपर्यंत ही कारवाई सुरूच होती. दरम्यान, झाडाझडती घेणाऱ्या पथकाला पाचही घरातून मोठ्या प्रमाणात ‘मविप्र’ संस्थेशी निगडीत कागदपत्र आढळून आल्याचे कळते. घरातील कपटासह इतर ठीकाणाहून मोठ्या प्रमाणात कागदपत्र जप्त करण्यात आली आहे.
…आणि पोलीस चक्रावले
आज सकाळी पोलिसांच्या पथकाने धाड टाकायला सुरुवात केल्यानंतर एका ठिकाणी पोहोचले. यावेळी घर बाहेरून बंद दिसत होते. परंतू पोलिसांनी जेव्हा घरात प्रवेश केला. त्यावेळी परिवारातील एक महिला घरातच आढळून आली. त्यामुळे काही वेळ पोलीस चक्रावले होते. परंतू त्यानंतर ही महिला घरातीलच सदस्य असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान,शेवटचे वृत्त हातीपर्यंत देखील पोलिसांची कारवाई सुरूच होती. दरम्यान, याबाबत एसीपी सुषमा चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाई बाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला. तसेच उद्या दुपारपर्यंत पत्रकारांना माहिती दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.
















