जळगाव (प्रतिनिधी) निंभोरा पोलीस स्थानकात अॅड. विजय भास्कर पाटील यांनी मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव (मविप्र) च्या वादातून माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर दाखल केलेला गुन्हा कोथरूड पोलीस स्थानकात नुकताच वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात पुढील काही दिवसात आरोपींची संख्या वाढणार असल्याची माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक असे की, मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव (मविप्र) या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी २०१८ मध्ये पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी अॅड. विजय पाटील यांनी रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर रोजी माजी मंत्री गिरीश महाजन,सुनील झंवर, रामेश्वर नाईकसह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यावर गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक या दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या कथित घटनेवर आता डिसेंबरमध्ये फिर्याद देण्यात आली, असा युक्तिवाद महाजन यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारीला निश्चित केली होती. परंतू ७ तारखेला काही कारणास्तव सुनावणी होऊ शकली नव्हती. त्यामुळे पुढील सुनवाई २७ जानेवारीला होणार आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पोलीस तपासात येत्या काही दिवसात आरोपींच्या संख्या वाढणार असून त्यात प्रामुख्या ‘मविप्र’ संबंधित लोकांचा समावेश असणार असल्याचे कळते. तसेच मविप्र निवडणूक नंतर संचालक मंडळ बरखास्ती संदर्भात मंत्रालयातून काही कागदपत्र फिरवण्यात आली होती. त्यामुळे तेथील काही कर्मचारी देखील आरोपी होतील का?, हे देखील आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दुसरीकडे अॅड. विजय भास्कर पाटील यांनी फिर्यादीत आधीच तपासात निष्पन्न होतील, असे आरोपी असा उल्लेख केलेला आहे. तसेच अॅड. विजय पाटील यांनी त्यांचे बंधू स्व. नरेंद्रअण्णा पाटील यांच्या मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पुरवणी जबाबात मागणी करणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, जळगावच्या सोशल मिडीयावर देखील अशा प्रकारचे संदेश फिरत असल्यामुळे येत्या काही दिवसात आरोपींच्या संख्या वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.