जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अत्यंत वर्दळीच्या अजिंठा चौफुली परिसरात काही दिवसांपूर्वी आढळलेल्या एका अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यूचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; मात्र स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हा प्रकार खुनाचा असल्याचे उघडकीस आणले. पैशांच्या क्षुल्लक वादातून हे हत्याकांड घडल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
९ जानेवारी रोजी अजिंठा चौफुली परिसरातील बाबा बॅटरीसमोर ५० ते ५५ वयोगटातील एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. तपासादरम्यान मृताची ओळख भाऊसाहेब अभिमन पवार (वय ५८, रा. पातोंडा, ता. अमळनेर) अशी पटली. पवार हे जळगावातील ‘असोदेकर श्री मटन हॉटेल’मध्ये वेटर म्हणून काम करत होते.
प्राथमिक तपासात मृत्यू नैसर्गिक अथवा अपघाती असावा, असा कयास होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना खबऱ्यामार्फत संशयास्पद माहिती मिळाल्याने तपासाची दिशा बदलली. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पवार यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी हुसेन शेख अयुब शेख (वय ३०, रा. ट्रान्सपोर्ट नगर, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने पवार यांच्याकडे पैशांची मागणी केली; मात्र नकार मिळाल्याने दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन आरोपीने पवार यांना खाली पाडून त्यांच्या छातीवर बसत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व अखेर गळा आवळून त्यांची हत्या केली. गुन्ह्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला होता.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. आरोपीला ट्रान्सपोर्ट नगर भागातून अटक करून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















