जामनेर (प्रतिनिधी) शहरापासून जवळच असलेल्या कांग नदीच्या पुलाखाली बोदवड येथील तरूणाचा मृतदेह ३१ जानेवारी रोजी सकाळी आढळून आला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाचे गूढ उकलले असून एकाला अटक केली आहे. पवन अशोक माळी (रा. बोदवड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
पवन हा मयत शुभम नंदू माळी (वय-२० रा. दत्तनगर बोदवड) हा तरूण भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करत होता. ३१ जानेवारी रोजी सकाळी जामनेर-बोदवड रस्त्यावरील पुलाच्या खाली त्याचा मृतदेह आढळून आला होता.सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. परंतु नंतर जामनेर पोलीसांनी माहिती घेतली असता हा मृतदेह शुभम माळी याचा असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकाने तपासचक्र फिरवायला सुरुवात केली. आजूबाजूचे सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. सीसीटीव्ही फुटेजवरून बोदवड येथील मयताचा मामेभाऊ पवन अशोक माळी यांच्यावर संशय बळावला. पोलीस तपासात नंतर दोघांमध्ये पैश्यावरून भांडण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पवन माळी याला ताब्यात घेत खाक्या दाखवताचा पवनने पैश्यांच्या वादातून नंदूचा खून केल्याची कबुली दिली.
पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, सहाय्यक फौजदार अशोक महाजन,सुनिल दामोदरे, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, पोना मुरलीधर बारे यांनी कारवाई केली. दरम्यान, पुढील कारवाईसाठी पवनला जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.