बेळगाव (वृत्तसंस्था) एकाच कुटुंबातील चार सख्खे भाऊ राजकारण आल्याचं आणि थेट विधानसभेचे आमदार झाल्याची घटना कधी ऐकली आहे का? पण कर्नाटक विधानसभेत हे शक्य झालं आहे. चार सख्खे भाऊ आमदार होण्याची देशातली ही पहिलीच घटना आहे. बेळगावमधील जारकीहोळी कुटुंबातील तिघे भाऊ विधानसभेचे आमदार आहेत, तर आता एक भाऊ विधानपरिषदेचा सदस्य झाला आहे.
२०१९ साली लखन यानी गोकाक मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढविली होती. बंधू रमेश जारकीहोळी यांच्या विरोधातच त्यानी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली होती. त्या पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार असलेल्या रमेश यांचा विजय झाला होता. त्यानंतर दीड वर्षांनी झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत लखन व रमेश एकत्र आले होते. या दोघांनी आपलेच बंधू व कॉंग्रेसचे उमेदवार सतीश यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे सतीश याना पराभव स्विकारावा लागला होता. या अशा परस्पर विरोधी राजकारणामुळेच जारकीहोळी बंधू राज्यात नेहमीच चर्चेत असतात. अशा स्थितीतही जारकीहोळी कुटुंबातील पाच जणांपैकी चौघे आमदार झाले आहेत.
जारकीहोळी सर्वात मोठे रमेश हे गोकाक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. भालचंद्र हे आरभावी मतदारसंघाचे आमदार आहेत. हे दोघेही भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. सतीश जारकीहोळी हे यमकनमर्डी मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. लखन हे मात्र अपक्ष म्हणून विधानपरीषदेवर निवडून गेले आहेत. सख्खे चौघे भाऊ आमदार होण्याचे हे देशातील दुर्मिळ उदाहरण आहे.