यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील साकळी येथून सप्टेंबर २०१८ मध्ये विजय उर्फ भैव्या उखाई लोधी या तरुणास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून हा तरुण तुरुंगात होता. या तरुणास मुंबई विशेष न्यायालयाने तब्बल साडेचार वर्षांनी जामीन मंजूर केला आहे. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण !
१० ऑगस्ट २०१८ रोजी नालासोपारा येथे एटीएसने कारवाई करून २० जिवंत बॉम्ब व बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करत वैभव सुभाष राऊत यास अटक केली होती. ६ सप्टेंबर रोजी साकळी येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी न्यास व दुसऱ्या दिवशी गावातीलच विजय उर्फ भैय्या उखाई लोधी अशा दोघांना अटक केली होती.
साकळीतून ज्वालाग्राही पदार्थ केले जप्त
सूर्यवंशी व लोधी यांच्याकडून ज्वालाग्राही पदार्थ, पेनड्राइव्ह, मोबाइल असे साहित्य जप्त केल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले होते. एटीएसकडून न्यायालयात देण्यात अालेल्या माहितीनुसार, साकळी गावातून ताब्यात घेण्यात आलेल्या विजय ऊर्फ भय्या लोधी याच्याकडून ज्वालाग्राही पदार्थ, ३ मोबाइल, ४ पेनड्राइव्ह व दुचाकीच्या काही नंबर प्लेट जप्त करण्यात अाल्या. वासुदेव सूर्यवंशीकडून १ डीव्हीडी व २ मोबाइल जप्त केल्याचेही समोर आले होते.
एटीएसने लावले होते गंभीर आरोप !
एटीएसने १० ऑगस्ट रोजी नालासोपारा येथून काही शस्त्रे व बाॅम्ब जप्त करून वैभव राऊतला अटक केली हाेती. नंतर याच प्रकरणात शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर व अविनाश पवार यांना अटक करण्यात आली होती. तर ६ सप्टेंबर रोजी साकळी येथून वासुदेव भगवान सूर्यवंशी यास ताब्यात घेतले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी याच गावातील लोधी वाड्यातील विजय ऊर्फ भय्या उखर्डू लोधी यालाही अटक करण्यात अाली हाेती. या प्रकरणात अटक केलेल्या अाराेपींचा मुंबई, नालासोपारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया, बॉम्बस्फोट, विशिष्ट विचारसरणीचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींच्या हत्या घडवण्याचा कट आखल्याचा आरोप एटीएसने केला होता.
सुर्यवंशीचा थेट संबध गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येशी संबंध?
माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार वासुदेव सुर्यवंशीचा थेट संबध कर्नाटकमधील गौरी लंकेश यांच्या हत्येशी असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले होते. सूर्यवंशी याने दिलेल्या माहितीवरून दोन कार, सहा दुचाकी एटीएसने हस्तगत केल्या आहेत. सूर्यवंशी याचा गौरी लंकेशसह नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येत सहभाग होता. याने आरोपींना वाहने पुरवली व नंतर ती वाहने नष्ट करण्यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले आहे. गौरी लंकेश यांच्या घराची रेकी करण्यासाठी वापरलेली वाहने सुर्यवंशीने बीडमध्ये नष्ट केल्याची कबुली दिल्याचे तत्कालीन एटीएसच्या सुत्रांनी सांगितले असल्याचेही माध्यमांनी त्यावेळी म्हटले होते. तर कन्नड विचारवंत आणि लेखक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अमोल काळे, गणेश मिस्कीन, शरद कळसकर, प्रवीण प्रकाश चतुर, वासुदेव भगवान सूर्यवंशी व अमित रामचंद्र बड्डी अशा सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
वासुदेव आणि विजयच्या एका मित्राचीही झाली होती चौकशी !
किरण मराठे या तरुणाला चार ते पाच तास चौकशी करून एटीएसच्या पथकाने साखळी गावात येऊन सोडले होते. हा तरुण हा नालासोपारा स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गावातील वासुदेव सूर्यवंशी व विजय उर्फ भैय्या लोधी या दोघांचा मित्र होता. त्याला जळगाव येथून पथकाने ताब्यात घेतले होते. त्याची गाडीतच सुमारे चार ते पाच तास चौकशी केली तसेच त्याच्या दोन मित्रांच्या संदर्भात काही माहिती जाणून घेतली. एटीएसच्या पथकाला तपासात आवश्यक ते सहकार्य करण्याच्या अटीवर त्याला सोडण्यात आले होते.