नांदेड (वृत्तसंस्था) नांदेडमधील ‘होला-मोहल्ला’ मिरवणुकीत पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. हल्ला मोहल्ला कार्यक्रमाच्या दरम्यान घडलेल्या हिंसेनंतर रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आता या प्रकरणात आतापर्यंत १८ लोकांना अटकही करण्यात आली असून जवळपास ४०० अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.
‘होला-मोहल्ला’ मिरवणूक रोखण्यासाठी पोलिस गेले होते तेव्हा पोलिस पथकावर तलवारी, दगड आणि दंड्यांनी हल्ला करण्यात आला. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता या मिरवणुकीस परवानगी नव्हती. समाजकंटकांनी एसपी आणि डीएसपीच्या गाड्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यादरम्यान शीख महिला दगडफेक देखील करताना दिसल्या. जमाव अचानक गुरुद्वाऱ्यात बाहेर निघाला आणि पोलिसांनी लावलेले बॅरिकेड तोडण्यात आले. हा जमाव तैनात केलेल्या पोलिसांवर तुटून पडला.
नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक (डीआयजी) निसार तांबोळी म्हणाले की, होला-मोहल्लाची मिरवणूक नांदेडच्या हुजूर साहिब गुरुद्वारा शीखांद्वारे काढली जाते. महाराष्ट्रात कोरोना साथीच्या आजारामुळे ही मिरवणूक काढू दिली गेली नव्हती. याची माहिती गुरुद्वारा समितीला देण्यात आली होती. त्यांनी आमच्या सूचनांचे पालन करून गुरुद्वाराच्या आवारात कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले होते.
शीख समाजात होळी या सणाला मोठे महत्त्व आहे. त्यानिमित्त शीख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी हल्ला बोलची मिरवणूक काढण्यात येते. परंतु, यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नांदेडमध्ये लॉकडाऊन असल्याने होळीनंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी नव्हती. तसेच संबंधित हल्ला मोहल्ला कार्यक्रम हा पूजा अर्चा करून साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते व त्यास शीख धर्मियांच्या बाबाजींनी सकारात्मक प्रतिसादही देण्यात आला होता. मात्र, या दरम्यान भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्यातील काही तरुणांनी सदर हल्ला मोहल्ला कार्यक्रमात पोलीस प्रशासनाला न जुमानता पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली.
यावेळी मिरवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलीस तैनात होते. चौरस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आली होती. या दरम्यान हल्ला मोहल्ला कार्यक्रमातील तरुणांनी पोलीसांशी हुज्जत घातली व हल्ला चढवून गंभीर जखमी केले. एवढेच नाही तर पोलीस अधीक्षकांच्या गाडीसह पोलिसांच्या इतर सात वाहनांची नासधूस व तोडफोड केली. तर काही माथेफिरू लोकांनी बॅरिकेटिंगही तोडली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
DIG निसार तांबोळी यांनी सांगितले की, सूचना असूनही सायंकाळी चार वाजता निशान साहिब यांना गुरुद्वारा गेटवर आणण्यात आले. पोलिसांनी नकार दिल्यावर शीख तरुणांनी वाद घातला आणि अचानक ४०० हून अधिक लोक हातात शस्त्रे घेऊन पोलिसांवर तुटून पडले. या हल्ल्यात जखमी झालेल्या कॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक आहे. जमावाने पोलिसांच्या सहा वाहनांचेही नुकसान केल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात ४०० हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.