जळगाव (प्रतिनिधी) अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) सोमवारी नांदेड, जालना आणि औरंगाबादसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत छापेमारी केल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे. नांदेड गांजा प्रकरणाचा धुळ्याचा अनिल टकलू मास्टर माईंड असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलीय. एनसीबीकडून टकलूच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले असून त्याचा कसून शोधही सुरु आहे.
नांदेड, एरंडोलनंतर आता धुळे कनेक्शन समोर आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. तर याआधी समोर आलेले ‘एरंडोल कनेक्शन’कडे मात्र दुर्लक्ष केले जातेय का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील मांजरम (ता.नायगाव) येथे पथकाने १५ नोव्हेंबर रोजी पाठलाग करून ११ कोटींचा गांजा पकडला होता. या वेळी दोन जणांना अटक करण्यात आली होती. यात एरंडोलच्या सुनील महाजन नामक व्यक्तीचा समावेश होता.
नक्षल फंडिंगशी संबंध, दोन जणांना अटक
या कारवाई पासून एनसीबीचे पथक नांदेड जिल्ह्यात पथक तळ ठोकून बसले आहे. एनसीबी पथकाने सोमवारी माळटेकडी परिसरातील एका व्यापारी संकुलात धाड टाकली. या धाडीमध्ये पथकाला एक क्विंटल वजनाची अफू बोंडे जप्त करण्यात आल्याचे कळते. दुसरीकडे एएनआयने १८ नोव्हेंबर रोजी दिलेल्या वृत्तात म्हटले होते की, 15 नोव्हेंबर रोजी 1,127 किलो गांजा जप्त केल्याप्रकरणी मुंबई NCB नांदेडला पोहोचले आणि नक्षल फंडिंगशी संबंध असल्याबद्दल दोन जणांना अटक केली होती. तसेच या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) चौकशी केलीय.
धुळ्यातील मास्टरमाइंड अनिल टकलूच्या ठिकाणांवर छापे
NCB ने धुळ्यातील मास्टरमाइंड अनिल टकलूच्या ठिकाणांवर छापे टाकले असून तो फरार आहे. तसेच टीम त्याचा शोध घेत आहे, असे एनसीबीने सांगितले होते. तर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी माहिती दिली होती की, ही खेप आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आणली जात होती आणि जळगाव जिल्ह्यासाठी बुक करण्यात आली होती.मात्र, तो ट्रक नांदेडमध्ये अडवून जप्त करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले होते. थोडक्यात एरंडोलचे कनेक्शन तेव्हाच स्पष्ट झाले होते. परंतु आता धुळे कनेक्शन देखील समोर आले.
ड्रग माफियांचा शोधासाठी छापेमारी
नांदेड जिल्ह्यात सोमवारी मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमने ड्रग्ज माफियांच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला आणि 100 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले. तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आज ‘इंडिया टूडे’ने दिले आहे. त्यात एनसीबीच्या एका सूत्राने इंडिया टुडे टीव्हीला सांगितले की, नांदेडमध्ये असलेल्या एनसीबी युनिटने महाराष्ट्रातील ड्रग माफियांचा शोध घेत छापा टाकला होता. तेथे “100 किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे दोन प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. तसेच येथून नोटा मोजण्याचे मशिन, दीड लाख रुपये रोख, क्रशिंग मशिन आदी मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
मुख्य सूत्रधार अनिल टकलूचा एनसीबीला चकवा
NCB ने नांदेडमधील पहिल्या छाप्यात 1,000 किलो पेक्षा जास्त गांजा जप्त करताना दोघांना अटक केली असली, तरी मुख्य सूत्रधार अनिल टकलू एनसीबीला चकवा देण्यात यशस्वी झाला होता. मुख्य सूत्रधार टकलू आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, संशयितांनी लपून बसलेल्या दुमजली इमारतीच्या बाहेर रस्ता वाहतूक विभागाचा फलक लावला असल्याचे देखील एनसीबीने सांगितलेय.
दुसरीकडे अमली पदार्थांच्या परराज्यातून होणाऱ्या तस्करीचे जाळे औरंगाबाद, जळगाव, नाशिक जिल्ह्यांतून राज्यभरात पसरले आहे. यात एरंडोल हे गांजा तस्करीच्या बाबतीत मोठे केंद्र बनल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतू नांदेडमधील कारवाईनंतर एनसीबीचे पथक जालना, औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये धाडी टाकतेय. परंतू ज्या ठिकाणी करोडोचा गांजा उतरणार होता, त्या ‘एरंडोल कनेक्शन’कडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक बघता ‘एरंडोल कनेक्शन’ तपासून पाहिल्यास वनकोठे, कासोद्यासह पुणे, मुंबई, धुळे, नाशिक सारख्या शहरांपर्यंतची साखळी उघड होऊ शकते, असे बोलले जात आहे.
एरंडोलला जो डिलिव्हरी स्वीकारणारा होता, तो अद्यापही मोकाट !
नांदेडमध्ये कारवाई केल्यानेत्र एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी माहिती देतांना सांगितले होते की, ही खेप आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आणली जात होती आणि जळगाव जिल्ह्यासाठी बुक करण्यात आली होती.मात्र, तो ट्रक नांदेडमध्ये अडवून जप्त करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणात एरंडोल येथील सुनील महाजन नामक व्यक्ती अटकेत आहे. तर महाजन हा जळगावच्या एका व्यक्तीसोबत संपर्कात असल्याची माहिती देखील समोर आली होती. तसेच गांजाने भरलेला ट्रक एरंडोलजवळ उतरवला जाणार असल्याचे देखील चौकशीत समोर आले होते. ट्रकमधील हा गांजा नांदेडमधून जळगावला जाणार होता. तिथं यातील काही गांजा देऊन ही गाडी पुढे महाराष्ट्रभरात गांजाचं वितरण करणार होती. ही मुंबई एनसीबीने केलेल्या सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक मानली जात आहे.
या प्रकरणी एनसीबीने ९८/२०२१ या क्रमांकाने गुन्हा नोंद केला आहे. हा माल कुणाला पोहचवला जाणार होता याचा तपास सुरू आहे. लवकरच यातील आणखी इतर तस्करांनाही अटक केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे एरंडोलला जो डिलिव्हरी स्वीकारणारा होता, तो अद्यापही मोकाट कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, वनकोठा येथील नंदू नामक तरुण धुळ्याच्या एका टोळीच्या संपर्कात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नांदेड प्रकरणात एरंडोलला जो डिलिव्हरी स्वीकारणारा होता, तो अद्याप मोकाट कसा?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.