जळगाव (प्रतिनिधी) शहरात मोठ्या प्रमाणात गांजा सापडल्याची घटना जेव्हा केव्हाही उघडकीस येते, त्या प्रत्येकवेळी विशाखापट्टणमचे कनेक्शन कायमच समोर आलेले आहे. त्यामुळे जळगावात कायमच येतो विशाखापट्टणम येथून गांजा, हे आता जवळपास स्पष्ट होत आहे.
मुंबई एनसीबीने नांदेड जिल्ह्यातील नांदेड-हैदराबाद मार्गावर गुप्त माहितीच्या आधारे मंजराम (तालुका – नायगाव) येथे कारवाई केली होती. त्यानुसार १५ नोव्हेंबरला पहाटेच्या वेळी केलेल्या या कारवाईत एनसीबीने १२ चाकी ट्रक ताब्यात घेतला होता. यातून एकूण तब्बल ११२७ किलोग्रॅम गांजा जप्त केला होता. याप्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत येऊन पोहचल्याचे उघड झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडालेली आहे. कारण नांदेडमध्ये पकडण्यात आलेल्या गांजाने भरलेला ट्रक विशाखापट्टणममध्ये लोड झाला होता. त्यानंतर हा ट्रक जळगाव अर्थात एरंडोल जवळील वनकोठे येथे येणार होता आणि मग येथून महाराष्ट्राच्या उर्वरित भागात वितरीत होणार होता. जळगावच्या व्यक्तीनेच मालची बुकिंग केल्याचे देखील उघड झाले आहे.
नोव्हेंबर २०२१ मध्ये मुक्ताईनगर-जळगाव मार्गे तस्करी होणाऱ्या गांजाची मोठी खेप एमआयडीसी पेालीसांच्या हाती लागली होती. त्यावेळी लाखो रुपये किंमतीचा जवळपास सहा टन(६३६ किलो) इतका मोठा गांजाचा साठा एमआयडीसी पेालीसांनी पकडला होता. या पकडलेल्या गाजांचे कनेक्शन त्यावेळी देखील विशाखापट्टणमसोबत जुळले होते.
ऑक्टोंबर २०१८ मध्ये देखील गांजा तस्करीची खळबळ उडवून देणारी घडणा जळगाव रेल्वे स्थानकावर उघडकीस आली होती. त्यावेळी आरपीएफच्या पथकाला १आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७.४० वाजता पुरी-ओखा या एक्सप्रेसच्या बी-२ बोगीतील ३४ ते ३७ या क्रमांकाच्या आरक्षित सीटजवळ गांजाने भरलेल्या ८ बॅगा आढळून आल्या होत्या. त्यात ३१ पॅकेटमध्ये ६५ किलो गांजा होता. धक्कादायक म्हणजे गांजाला पोलिसांचेही संरक्षण असल्याचे आरपीएफच्या निदर्शनास आले होते. कारण जळगाव रेल्वे स्टेशन येताच या बॅगांजवळ दोन पोलीस कर्मचारी पोहचले होते, मात्र आरपीएफचे पथक पोहचताच हे पोलीस तेथून गायब झाले होते. दरम्यान, हा गांजा जळगावातील जाखनी नगर कंजरवाड्यात येत असल्याची माहिती देखील पोलीस तपासात उघड झाली होती.
ज्यावेळी विशाखापट्टणम येथून जळगावसाठी आठवड्यातून दोन दिवस एक्सप्रेस असायची त्यावेळी रविवार व गुरुवारी या गाड्या तेथून सुटत असायच्या तसेच विशाखापट्टणम येथील चित्तपल्ली, अंकपल्ली, मदगिरी व गाजवटा येथून हा गांजा जळगाव शहरात आणला जातो, अशी माहिती समोर येत आहे. गांजाचा व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांनी या व्यवसायात शंका येऊ नये यासाठी महिलांना देखील पुढे केले जात आहे. कारण ज्यावेळी गांजा सापडला होता त्यावेळी पुरी-ओखा या एक्सप्रेसमध्ये गांजा सापडला, त्या आरक्षित सीटपासून काही अंतरावर दोन महिलाही होत्या. या दोन्ही महिला जळगाव शहरातीलच असून सुरुवातीपासून गांजासोबत होत्या. नंतर या महिलाही तेथून गायब झाल्या, पुढे या महिला नंदुरबार येथे उतरल्याचे त्यावेळी समोर आले होते.
एकंदरीत जळगावात कमी अधिक प्रमाणात गांजा कधीही सापडला असेल त्यातील बहुतांशवेळी त्याचे कनेक्शन विशाखापट्टणमसोबत आढळून आलेले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी विशाखापट्टणमसोबत ज्यांची ज्यांची साखळी जुडलेली असेल, अशा लोकांना शोधून काढले तर नांदेड प्रकरणात मोठी मदत होऊ शकते, असे बोलले जात आहे.