अमळनेर (प्रतिनिधी) येथील एनडीपीएसच्या दाखल गुन्ह्यात मागील वर्ष भरापासून फरार असलेला वनकोठ्याचा नंदू बेलदार हा मास्टर माइंड असल्याची माहिती समोर येत आहे. एवढेच नव्हे तर, पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून त्याला अटक केली. यावेळी त्याची पोलिसांसोबत झटापट झाली. तसेच अमळनेरपर्यंत काही वाहन पोलिसांच्या गाडीचा पाठलागही करत होती.
या संदर्भात अधिक असे की, अमळनेरात एनडीपीएसचा एक गुन्हा दाखल आहे. त्यानुसार तीन आरोपींकडून साधारण 75 किलो गांजा पकडण्यात आला होता. आरोपींच्या जबाबनुसार पुरवणी दोषरोपत्रात नंदू बेलदार हा या गांजा तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. परंतू मागील एक वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु नंदू कासोदा येथे एका लग्नात येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी एक पथक तयार करत कासोदा येथे रविवारी रात्री धडकले. पोलिसांनी नंदूला ताब्यात घेताच त्याच्या सोबतच्या तरुणांना गोंधळ घालायला सुरुवात केली. अगदी पोलिसांसोबत झटापट देखील झाली. यानंतर पोलिसांनी नंदूला गाडीत टाकले. त्यानंतर नंदूच्या मित्रांनी पोलिसांच्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली. या वाहनांचा पाठलाग अमळनेरपर्यंत सुरू होता. दरम्यान, नंदूला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात एनसीबीच्या पथकाने मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्यानंतर एरंडोल तालुक्यातील वनकुठेगाव प्रचंड चर्चेत आले होते. याच गावातील नंदू बेलदार नामक तरुणाला अमळनेर पोलिसांनी एका एनडीपीएसच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात पकडलेल्या गांजाचे धागेदोरे वनकोठे येथे पोहोचली होती.