लासलगाव (प्रतिनिधी) स्वत:च्या सोळा वर्षीय सावत्र मुलीला शेतात चारा आणण्यासाठी घेऊन जात वारंवार बलात्कार करुन गरोदर केले असल्याचे आरोपात नराधाम बाप श्रावण लहानु गायकवाड (वय ३४) रा पिंपळगांव (निपाणी) ता. निफाड यास निफाडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी डी दिग्रसकर यांनी दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, आरोपी श्रावण लहानु गायकवाड (रा. पिंपळगांव (निपाणी) ता. निफाड) याने स्वत:च्या सोळा वर्षीय सावत्र मुलीला शेतात गवत आणणेसाठी घेऊन जात जीवे ठार मारण्याची धमकी दिली व सतत लैंगिक अत्याचार करत होता. पिडित मुलीस मासिक पाळी आली नाही म्हणुन तिचे आईने वैद्यकिय उपचारासाठी डाॅक्टरांकडे नेल्यावर पिडित मुलगी गरोदर राहिल्याचे निदर्शनास आले. पिडितेस जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी पिडितेने सावत्र बापाने केलेले क्रुरकर्म पोलिसांना सांगितले. त्यावरुन सायखेडा पोलिस स्टेशनला भा द वि कलम 376, (2) एफ एन 506, बाललैंगिक अत्याचार कायदा कलम 4 ,6 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. नराधाम पित्यास अटक करण्यात आली. तपासा दरम्यान पिडित मुलीसह तिच्या गर्भाचे व नराधाम पित्याचे नमुने डी एन ए तपासाकरिता पाठविण्यात आले होते. तो डी एन ए अहवाल पाँझिटिव्ह आला. पिडितेसह तीच्या आईचे जबाब न्यायदंडाधिकार्यांसमोर नोंदविण्यात आले. आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकिल अँड. रामनाथ शिंदे यांनी तपास अधिकारी पोलिस निरिक्षक अंबादास मोरे, रामचंद्र कर्पे, डि एन ए अहवाल तपासणी करणाऱ्या डाॅ. वैशाली महाजन यांचेसह एकुण सोळा महत्वपूर्ण साक्षीदारांची साक्ष नोंदविली प्रभावी युक्तिवाद केला. या खटल्यात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन पो हवा संदिप डगळे, संतोष वाकळे यांनी सहकार्य केले.
न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्यावरुन आरोपी पित्याने सोळा वर्षीय अल्पवयीन सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याची बाब शाबीत झाली. आरोपी पिता श्रावण ऊर्फ वाळिबा लहानु गायकवाड यांस भादवि कलम 376,(2) एफ एन, व बाललैंगिक अत्याचार कायदा कलम 4, 6 प्रमाणे दोषी ठरवत आजीवन सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड न भरल्यास तिन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे
पिडितेसह आईदेखील झाली होती फितुर !
सदर खटल्यातील पिडितेने न्यायालयासमोर साक्ष नोंदवितांना सरकार पक्षाला सहकार्य केले नाही. या घटनेतील साक्षीदार आई देखील फितुर झाली. मात्र, पिडिता आरोपी व पिडितेच्या गर्भातील नमुने डि एन ए तपासणी केली असता ते पाँझिटिव्ह आले. पोलिसांनी केलेला तपास यांचे परस्परपुरक धागेदोरे या आधारावर पित्यास न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली.