नाशिक (वृत्तसंस्था) भद्रकाली पोलीस ठाण्यासमोर आ. फरांदे आणि गिते यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यावेळी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या महापालिका इमारतीत मतदानासाठी मोठी गर्दी झाली होती. त्याबाबत आ. देवयानी फरांदे याबाबत चौकशी करीत होत्या. मतदान झालेल्या नागरिकांची देखील येथे मोठी गर्दी होती. मतदानासाठी लांब रांगा देखील होत्या. त्यामुळे आ. फरांदे यांनी मतदान केलेल्या मतदारांना बाहेर जाण्यास सांगितले. या सर्व प्रकारामुळे मतदानासाठी आलेले नागरिक आणि आमदार फरांदे यांच्यात देखील वाद झाला. हा वाद सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गिते तेथे आले.
फरांदे यांनी मतदारांना धमकावू नये, असे गिते यांनी सांगितले. यावेळी उपस्थित कार्यकत्यांनी जोरदार घोषणा दिल्याने तणाव निर्माण झाला. याच वेळी मतदारांनीही तक्रारी केल्या. माजी महापौर विनायक पांडे हे देखील येथे दाखल झाले. यावेळी आ. फरांदे आपले प्रतिस्पर्धी वसंत गिते यांच्यावर चांगल्याच भडकल्या. त्यांनी ‘हा परिसर म्हणजे तुमची जहागिरी आहे काय?’ असे म्हणत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केल्याचे उपस्थितांनी सांगितले. या मुद्यावरून फरांदे व गिते यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत गर्दी पांगवली. त्यानंतर तणाव निवळला.