नाशिक (वृत्तसंस्था) सटाणा-बागलाण तालुक्यातील दोधेश्वर अॅकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भीषण अपघात झाला आहे. घाटात चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाला तर सुमारे ३० ते ३५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघातात निलेश वनोरे याचा मृत्यू झाला आहे.
अॅकॅडमीतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरद्वारे नेण्यात येत होतं. मात्र सटाणा-बागलाणच्या दोधेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली अचानक पलटली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर अनेक विद्यार्थी जखमी झाले. जखमींपैकी काहींना सटाणा तर काहींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रशिक्षणार्थी श्रावणी सोमवार निमित्त दोधेश्वरच्या शिवमंदिरात भरणाऱ्या यात्रेत बंदोबस्तासाठी गेले होते. तेथून परतताना हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या वाहनांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. घाटातील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.