जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली परिवार संवाद यात्रा सध्या जळगावात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी पक्षाच्या जिल्हा कार्यालयाबाहेर लावलेल्या बॅनरवरून चक्क एकनाथ खडसे यांच्या फोटोला स्थान देण्यात आलेले नाही.
भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांना गुरुवारी पहिल्यांदाच पक्षातील अंतर्गत गटबाजीचा अनुभव आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यभर दौरा करत आहेत. याच अनुषंगाने, ते गुरुवारी जिल्ह्यात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी माजीमंत्री गुलाबराव देवकर यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयाबाहेर भलेमोठे बॅनर लावले. या बॅनरवर एकनाथ खडसे यांचा फोटो मात्र, वगळण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याची एकच चर्चा सुरू झाली. या साऱ्या घडामोडींमुळे खडसे समर्थक नाराज झाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी खडसे समर्थकांनी देखील शहरात बॅनर लावले आहेत. मात्र, या बॅनरवर खडसे यांच्यासह त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांचे फोटो आहेत. त्यामुळे देवकर यांनी लावलेल्या बॅनरवर खडसेंचा फोटो मुद्दाम डावलला का? याबाबत स्पष्टता होऊ शकलेली नाही.
जयंत पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भुसावळमध्ये लावलेले तब्बल १०७ बॅनर्स नगरपालिकेकडून खाली उतरवण्यात आले आहेत. भुसावळ नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक लावण्यासाठी मागितलेली परवानगी देखील इलेक्ट्रिकल पोलचे कारण पुढे करून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे भुसावळमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. परिणामी सध्या भुसावळमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.