पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील नांदेड सिटी परिसरात राहणाऱ्या व नॅशनल हॉर्स रायडर असलेल्या बारावीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन उडी घेत अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. श्रिया गुणेश पुरंदरे (वय १७) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड सिटी येथील मधुवंती इमारतीमधील डी १०३ या फ्लॅटमध्ये श्रिया पुरंदरे राहत होती. सध्या तिचे बारावीचे शिक्षण सुरू होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ती गॅलरीत गेली होती. त्याच वेळी तेथील अभिजीत देशमुख यांना खाली काही तरी जोरात पडल्याचा आवाज आला. अभिजीत यांनी खाली पाहिले असता, त्यांना श्रिया पडल्याचे दिसून आले. त्यावर तिला तत्काळ रूग्णालयात नेले असता, तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. श्रियाच्या आत्महत्येचं कारण अद्याप पर्यंत समजू शकलं नसल्याचे हवेली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
















