जळगाव (प्रतिनिधी) फॉक्सकॉन वेदांतानंतर टाटा एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महानगरतर्फे आकाशवाणी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे फोटो असलेली कागदी विमाने हवेत उडवत सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. राज्यातून एकामागून एक प्रकल्प गुजरातला नेला जात असल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीने आंदोलन केले. बेरोजगारांना हाताला काम नाही. सरकार गुजरात सरकारची सेवा करण्यात मग्न असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. जळगावात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस महानगरतर्फे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वात सरकारच्या निषेधार्थ आकाशवाणी चौकात निदर्शने करण्यात आली. वाल्मिक पाटील, अमोल कोल्हे, भगवान सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. गद्दारांना 50 खोके, महाराष्ट्राला धोके, उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणांना, गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी, महाराष्ट्राचे गद्दार, गुजरातचे वफादार अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमिश शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे फोटो असलेली कागदी विमाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हवेत भिरकावून प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला.