मुंबई (वृत्तसंस्था) हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान देत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
तसेच शिवसेनेच्या विरोधात प्रचार करण्यासाठी आपण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या निवडणुकीत आपण शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार आहोत असं त्या माध्यमांना बोलताना म्हणाल्या आहेत. मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या वादानंतर झालेल्या घडामोडीनंतर चर्चेत असलेल्या नवनीत राणा यांना आज लीलावती रुग्णालयातून सुटका मिळाली आहे. बाहेर आल्यावर त्यांनी ठाकरे सरकारला आमची काय चूक होती असा सवाल करत, “तुम्ही आम्हाला हनुमान चालीसाच्या कारणावरुन अटक करत असाल तर मी चौदा दिवसंच काय चौदा वर्षे तुरूंगात राहायला तयार आहे.” असं त्या म्हणाल्या.
“तुम्हाला आज पद आहे पण तुम्ही जनतेसमोर येऊन लढवून दाखवा, मी तुम्हाला चॅलेंज करते. मी तुमच्या विरोधात लढणार आहे. जनता तुम्हाला सांगेल की राम आणि हनुमानाचा विरोध करणाऱ्यांचं काय होतंय.” असं म्हणत त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. “तुमच्यामध्ये दम असेल तर तुम्ही माझ्या विरोधात लढवून दाखवा, तुम्हीच मतदारसंघ निवडा त्या मतदारसंघातून मी तुमच्या विरोधात लढणार आणि एका महिलेची ताकद काय आहे हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि निवडून येणार.” असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
“दोन पिढ्यांपासून मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातात आहे पण आता पुढच्या निवडणुकांत रामभक्त आणि जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. ज्या पद्धतीने शिवसेनेने भ्रष्टाचाराची लंका इथे उभारली आहे, त्या लंकेला संपवण्यासाठी मी लढणार आहे. या भ्रष्टाचारी लंकेला संपवण्यासाठी मी कुठेही उभं राहायला तयार आहे.” असं त्या म्हणाल्या. “त्यांनी माझं घरही पाडलं तरी माझ्या मुखातून हनुमान आणि रामाचं नाव जाणार नाही.” असं त्या यावेळी माध्यमांना बोलताना म्हणाल्या.