मुंबई (वृत्तसंस्था) अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकरवर निशाणा साधला आहे. मलिक यांनी आज काही स्क्रिनशॉट शेअर करत पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मलिक यांनी क्रांती रेडकरच्या चॅटचे स्क्रिनशॉट ‘अरे देवा…’अशा कॅप्शनसहीत शेअर केले आहेत.
मागील काही आठवड्यांपासून वानखेडे कुटुंबीय वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन आपली बाजू मांडत आहेत. दरम्यानच्या काळात नवाब मलिक यांनी दाऊदशी संबंधित संपत्ती घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर मलिक यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. याच वादाच्या पार्श्वभूमीवर एका युझरने क्रांतीला मलिक आणि दाऊद कनेक्शनसंदर्भात माहिती असल्याचं सांगितलं. त्याच विषयावरील हे चॅट आहे.
मलिक यांनी शेअर केलेला संवाद हा ट्विटरवरील आहे. यामध्ये एका युजरने क्रांती रेडकरला माझ्याकडे नवाब मलिक यांचे काही फोटो असल्याचं सांगितलं आहे. “क्रांती रेडकर मॅडम माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा संबंध असल्याचे पुरावे आहेत, अधिक माहितीसाठी थेट मेसेज करा,” असं या युझरने म्हटलं आहे. त्यावर रात्री पावणे अकराच्या सुमारास क्रांती रेडकरने, “तुमच्याकडे काय पुरावे आहेत?”, असा रिप्लाय केलाय. “माझ्याकडे नवाब मलिक आणि दाऊद यांचा फोटो आहे,” असं या युझरने म्हटलंय. त्यावर पुढच्या मिनिटालाच क्रांतीने, “कृपया तो फोटो पाठव. याबदल्यात तुला योग्य तो मोबदला मिळेल,” असा रिप्लाय केलाय. या संवादाचा स्क्रीनशॉर्ट मलिक यांनी, “अरे देवा…” अशा कॅप्शनसहीत शेअर केलाय.
हा प्रकार एवढ्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं – क्रांती रेडकर
मात्र या ट्विटनंतर काही तासांनी क्रांतीने ट्विट करत हा सारा प्रकार म्हणजे बनाव असल्याचं म्हणत संताप व्यक्त केलाय. नवाब मलिक यांनी जो फोटो शेअर केलाय हो एका सटायर म्हणजेच उपहासात्मक मिम्स आणि फोटो तयार करणाऱ्या अकाऊंटवरील असून तो एडीटेड कंटेट असल्याचं या अकाऊंटची मालकी असणाऱ्या व्यक्तीनेच म्हटलं आहे. क्रांतीने हे स्क्रीनशॉर्ट शेअर करत, “हा प्रकार एवढ्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं,” असं म्हटलंय.