मुंबई (वृत्तसंस्था) कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स (Cruise Drugs Case) प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा (Prabhakar Sail Death) मृत्यू झाला आहे. प्रभाकर हा आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत आलेल्या किरण गोसावीचा बॉडीगार्ड होता. तसेच प्रभाकरने एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते.
एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा काल (शुक्रवार) मृत्यू झाला. त्यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल त्यांचे चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज सकाळी ११ वाजता प्रभाकर साईलचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाईल. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, त्या क्रूझबाहेर आपण हजर होतो, असा दावा प्रभाकर साईल यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संरक्षणासाठी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव देखील घेतली होती. किरण गोसावीचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या प्रभाकर साईलने माध्यमांसमोर येत ड्रग्ज प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले होते. साईलने मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. तसेच आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला होता. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचंही साईल यांनी म्हटलं होतं.
















