मुंबई (वृत्तसंस्था) छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. आता यावरुन “हे पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवण्याची निश्चितच वेळ आली आहे,” अशा शब्दांत नवी मुंबई मनसेचे अध्यक्ष आणि प्रवक्ते गजानन काळे आक्रमक भूमिका घेतली आहे.
काय म्हणाले कोश्यारी?
भगतसिंह कोश्यारी आपल्या भाषणात म्हणाले की, आमच्या शाळेत तुमचे आदर्श कोण असे विचारले जायचे. त्यावेळी कुणी सुभाषचंद्र बोस तर कोणी नेहरू, तर कोणी गांधी सांगायचे. आता नव्या युगाचे मी सांगतो आहे. तुम्हाला दुसरीकडे शोधायची गरज नाही. याच महाराष्ट्रात तुम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते डॉ. नितीन गडकरी हे आदर्श आहेत. असे म्हणत त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी यांची तुलनाही केली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कोणी तुमचे आदर्श विचारले तर तुम्ही नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे नाव घ्या. तेच नव्या युगाचे शिवाजी महाराज आहेत. शिवाजी तो अब पुराने युग की बात हो गयी है..!, असेही त्यांनी म्हटले.
राज्यपालांच्या काळ्या टोपीखालचा मेंदू सडका
आमदार अमोल मिटकरी म्हणाले, राज्यपालांच्या काळ्या टोपीखालचा मेंदू सडका आहे. ते वादग्रस्त वक्तव्य करण्यात पटाईत आहेत. आज पुन्हा त्यांनी आपली जीभ उचलली आणि टाळ्याला लावली. ते शिवाजी महाराजांबद्दल एकेरी बोलले. छत्रपती शिवाजी महाराज असे बोलण्याचे औदार्य दाखवले नाही. कोई गांधी को मानता है, कौई नेहरू को मानता है, कोई सुभाषचंद्र बोस को मानता है असे ते एकेरी बोलले, असा संताप मिटकरी यांनी व्यक्त केला.
संभाजी ब्रिगेडची टीका
तर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे यांनी देखील राज्यपालांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारींना त्यांनी महाराष्ट्र आणि शिवद्रोही म्हटलं आहे. तसेच तुम्ही सह्याद्रीच्या पर्वत रांगावर आणि गड किल्ल्यांवर फिरा म्हणजे तुम्हाला कळतील छत्रपती शिवाजी महाराज, उगाच उठून जीभ टाळ्याला लावायचे धंदे बंद करा.
राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा
युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, राज्यपाल असे का बोलतात मला समजत नाही. त्यांना महाराष्ट्राबाहेर पाठवून द्या, अशी विनंती मी हात जोडून पंतप्रधानांना करतो. अशी व्यक्ती आम्हाला नकोय. जी महाराष्ट्राचे वैभव धुळीस मिळवतायत. असा घाणेरडा विचार घेऊन ते येऊच कसे शकतात.